ईडन गार्डन मैदानाला आणखी एक संधी

January 28, 2011 2:47 PM0 commentsViews: 15

28 जानेवारी

कोलकात्ताचं ऐतिहासिक ईडन गार्डन मैदान वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या स्टेडियम होणारी भारत विरुद्ध इंग्लंड ही मॅच आयसीसीने या मैदानावर न खेळवण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमचं बांधकाम अर्धवट असल्याचं कारण त्यासाठी आयसीसीने दिलं. पण त्यांना आयसीसीनं आणखी एक संधी दिली आहे.

ऐतिहासिक ईडन गार्डन वेळेवर पूर्ण करण्याची वेळ निघुन गेली. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल कितीही बोंब मारु देत की स्टेडियम या महिन्याअगोदर पूर्णपणे तयार होईल पण एका मागोमाग एक दिल्या गेलेल्या डेडलाईन नंतरही काम पूर्ण झालं नसल्यानं आयसीसीने मात्र कारवाईचा बडगा दाखवला. 27 फेब्रुवारीला होणारी भारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच दुसरीकडे हलवण्यात आली. आयसीसीचे सीईओ हरुन लोरगाट यांनी म्हटलं. वर्ल्ड कप मॅचच्या तयारीसाठी प्रत्येक स्टेडियमला पुरेसा वेळ देण्यात आला होता. पण आता असा निर्णायक क्षण आहे जिथे आम्हाला कोणताही धोका पत्करता येणार नाही. आयोजन समितीनेच डेडलाईन दिलेली होती पण दुदैर्वाने 25 जानेवारीची डेडलाईन त्यांना पाळता आली नाही. आयसीसीला विश्वास पटवून देण्यात ईडन गार्डन प्रशासन असमर्थ ठरलं. त्यामुळे हा निर्णय घेणं फार कठीण होतं हा निर्णय दुदैर्वी असला तरी तो घेणं भाग होतं.बंगाल क्रिकेट असोशिएसन मात्र या निर्णयामुळे हडबडुन गेलं आणि आयसीसीनं पक्षपातीपणा केल्याचा थेट आरोप त्यांनी केला.दालमिया आयसीसीवर दुटप्पी वागणुक दिल्याचा आरोप करत असले तरी ही दृश्य काही वेगळीच कहाणी सांगत आहे. मैदानाची अनेक काम अजूनही अपुरी आहेत. मैदानातले खड्डे अजूनही तसेच आहेत. बाहेरची कामंही अजून पूर्ण झालेली नाहीत. स्टॅण्डमध्ये खुर्च्या बसवल्या गेलेल्या नाहीत. खेळाडूंसाठीचं हे ड्रेसिंग रूमही अस्ताव्यस्त आहे. बीसीसीआयनेही वस्तूस्थितीकडे डोळेझाक केली होती पण आता हे प्रकरण त्यांच्यावरंच शेकलं आहे.

दालमिया यांनी बीसीसीआयला पत्र लिहुन हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती आणि या विनंतीनंतर ईडन गार्डनची पुन्हा पाहणी करण्यात येणार असण्याचा दावा बंगाल क्रिकेट असोसिएशनने केला. त्यानुसार येत्या 31 जानेवारीला आयसीसीची टीम स्टेडियमची पाहणी करेल. 7 फेब्रुवारीपर्यंत स्टेडियम पुर्णपणे बांधुन तयार करु असं आश्वासन आम्ही आयसीसीली दिलंय अशी माहिती असोसिएशनचे संयुक्त सचिव बिश्वरुप डे यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा बघायचंच की त्यावेळेला तरी ईडन गार्डन तयार असले की नाही.

close