भेसळमाफियांचा रिपोर्टवर सरकारनं कारवाई केली नाही !

January 28, 2011 6:26 PM0 commentsViews: 3

28 जानेवारी

मनमाडचेअप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येनंतर राज्यभरात तेल भेसळखोरी कुठल्या थराला पोहोचली हे उघड झालं. पण या भेसळमाफियांची माहिती सरकारला आताच मिळाली आहे असं नाही तर आजपासून तब्बल पंधरा वर्षांपूर्वी राज्यात भेसळमाफियांचा सुळसुळाट झाल्याचा रिपोर्टच नाशिकच्या तत्कालीन विभागीय आयुक्त लिना मेहंदळे यांनी दिला होता. पण सरकारनं त्यावर कारवाईच केली नाही असा गौप्यस्फोट खुद्द लिना मेहंदळे यांनी केला.

माझे तत्कालीन सहकारी विभागीय आयुक्तानी राज्यातील तेलभेसळीचा मासिक रिपोर्ट दिल्यानंतर मला धक्का बसला. त्यानंतर मी आणखी काही जणांना सांगून दोन वर्षातील तेल वापराचं ऑडिट करुन घेतलं. त्यातून एक धक्कादायक बाब उघड झाली. कोणत्याही केरोसिन किंवा पेट्रोल डिलरनं आपल्या उलाढालीचा हिशेब ठेवला नव्हता. यानंतर मी एक रिपोर्ट तयार केला आणि पेट्रोल आणि केरोसिनची एजन्सी एकाच व्यक्तीला दिली जाऊ नये असं मी सुचवलं कारण त्यामुळे भेसळीला लगाम घालता येईल. त्याचबरोबर ज्या डिलर्सनी हिशेब ठेवला नव्हता त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी असंही मी सुचवलं होतं. पण या रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यानंतर 2008-2009 मध्ये मी पुन्हा एकदा तत्कालीन कायदा सचिवांशी या मुद्यावर चर्चा केली. रेशनिंग अधिकार्‍यांना थेट कोर्टात केस दाखल करण्याचे अधिकार मिळावे अशी सुधारणा भारतीय दंड संहितेत करावीअसं मी सुचवलं. माझ्या सुचनेचा राज्य सरकारनं विचार करुन ती केंद्राकडे पाठवली पण पुढे त्याचं काय झालं ते मला माहिती नाही. सोनवणेंची हत्या करणार्‍यांना अटक करणं पुरसें नाही तर यामागील मोठे मासेही गळाला लागणं आवश्यक आहे. सगळ्याच सरकारी कर्मचार्‍यांना संरक्षण देणं अशक्य आहे पण माफियांवर कडक कारवाई करुन पोलीस एक संदेश तर देऊ शकतात. सरकारनं या रिपोर्टवर कारवाई केली नाही कारण या रिपोर्टमध्ये मेहंदळे यांनी भेसळमाफियांच्या रॅकेटला वरदहस्त असलेल्या बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली होती असं बोललं जातंय पण यावर मेहंदळे म्हणतात की, कोणते राजकीय नेते होते त्यांची नावं मी घेणार नाही पण मी कुणाबद्दल बोलतेय ते सगळ्यांना माहितेय. एकूणच गेल्या पंधरा वर्षात सात मुख्यमंत्री झाले पण मेहंदेळ यांच्या रिपोर्टमधील शिफारशी काही अंमलात आल्या नाहीत.

close