मुंबईतील उत्तर भारतीय टॅक्सीवाल्यांचा मराठी संस्कृतीला सलाम

November 4, 2008 9:46 AM0 commentsViews: 2

3 नोव्हेंबर, मुंबईअशिष जाधवमराठीच्या मुद्यावर राजकारण तापलंय. मनसेच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय राजकारणच ढवळून निघालंय. पण सर्वसामान्य माणूस या आंदोलनापासून दूर आहे. मराठी-अमराठीच्या आंदोलनात पहिला घाव मुंबईतल्या टॅक्सींवर पडतो. शेकडो उत्तर भारतीय टॅक्सीवाल्यांच्या टॅक्सी फोडल्या गेल्या. पण त्यासाठी एकही टॅक्सीवाला मराठी माणसाला जबाबदार धरत नाही. उलट मुंबई आणि मराठी संस्कृतीला सलाम करणारेच टॅक्सीचालक पाहायला मिळतात. मुंबईलाच आपली कर्मभूमी मानणार्‍या राजनाथ यादवांची रोजीरोटी टॅक्सीवर चालते. गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवतात. त्यामुळं साहजिकच मुंबई आणि महाराष्ट्राविषयी ते भरभरून बोलतात. ' 9 वर्षांचा असल्यापासून मुंबईत आहे. शिक्षणही इथेच झालं ', असं यादव सांगत होते. उत्तर भारतीय टॅक्सीचालक जसे यादवांचे मित्र तसंच मराठी टॅक्सीचालकही त्यांचे मित्र आहेत. ' आंदोलनात त्यांची टॅक्सी फोडली जाते. या टॅक्सीवर त्यांची रोजीरोटी आहे ', असं टॅक्सीचालक चंद्रकांत अडसूळ यांनी सांगितलंय. उत्तर भारतीय टॅक्सीचालकांना मारहाण केली जातेय. त्यामुळं सर्वच जुने टॅक्सीवाले चिडले आहेत.अनेक जुन्या टॅक्सीचालकांनी तर मराठी माणसाच्या चळवळींमधून भाग घेतलेला आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. ' मृणालताई गोरे, मधू दंडवते यांच्याबरोबर मी होतो. सगळे लोक धर्माच्या नावाखाली लढत असताना आम्ही कोकण रेल्वेसाठी लढत होतो ', असं मराठीत टॅक्सीचालक ज्ञानसिंह यादव सांगत होते.मराठी – अमराठीचा वाद चिघळवणार्‍यांना खरा मराठी माणूसच कळालेला नाही, असं जर या उत्तर भारतीय टॅक्सीचालकांना वाटत असेल, तर मग मराठी माणसानंही खरं काय नि खोटं काय, याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.

close