भेसळखोर माफियांविरुद्ध आयबीएन- लोकमतची खास मोहीम ; जंग माफियाविरुद्ध..

January 31, 2011 10:28 AM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक

31 जानेवारी

यशवंत सोनवणे यांच्या हत्येनंतर राज्यातील तेल माफियांचा विषय समोर आला. ही हत्या म्हणजे तेल माफियांनी सरकारला दिलेलं आव्हान आहे. या प्रकरणाचा तडा लावण्याबरोरच सरकारसमोर आव्हान आहे राज्यातील तेल माफियांना संपवून टाकण्याचं. पानेवाडीजवळ तेल भेसळीच्या अड्यावर गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आलं. आणि या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. सरकारनं 24 तासात छापे टाकून कारवाईचा दिखावा केला. राज्याला पोखरणार्‍या तेलमाफियांचे पाळमुळं खोडून काढण्याचे आश्वासन लोकांना दिले. पण त्याअगोदर सरकारला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.

जंग माफियाविरुद्ध – आयबीएन-लोकमतचे सवाल

1) पोपट शिंदेचा जबाब का नोंदवला जात नाही ?2) पोपट शिंदेच्या तडिपारीच्या प्रस्तावात त्रुटी ठेवणारा अधिकारी कोण?3) सरकार त्याच्यावर काय कारवाई करणार?4) पाच वर्षांत मनमाड पोलिसांनी फक्त 9 धाडी टाकल्या या माफियांविरुद्ध कठोर कारवाई का झाली नाही ?5) सराईत गुन्हेगार असून पोपट शिंदे बाहेर कसा?6) पोपट शिंदेला कोणत्या नेत्यांचं संरक्षण होतं ?7) पोपट शिंदेचा अड्डा कोणाला बळकावयाचा होता ? 8) त्यासाठी मनमाडचा कोणता नेता मध्यस्थी करत होता ?9) पोलीस पुरवठा विभाग, महसूल विभाग आणि तेलमाफिया यांचे संबंध कसे होते ?10) मनमाडमध्ये कोणत्या नेत्यांचे किती टँकर आहेत?11) त्यांच्या माध्यमातून होणार्‍या भेसळीवर कारवाई का नाही ?12) आतापर्यंत भेसळ करणार्‍या पेट्रोल पंपांवर किती धाडी टाकल्या? आणि किती सिल केले ?13) काळाबाजार करणारे रॉकेलचे किती परवाने आत्तापर्यंत रद्द केले गेले ?

एकट्या मनमाडबद्दलचे हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. संपूर्ण राज्यातील तेलमाफियांचे प्रश्न तर अजून दूरच आहेत. त्याचबरोबर लँड माफिया, वाळू माफिया, दूध माफिया यांना नेस्तनाबूत करण्याचं आव्हानही सरकारसमोर आहे.

close