मुळा-प्रवरा आता महावितरणकडे

January 31, 2011 4:11 PM0 commentsViews: 10

31 जानेवारी

22 कोटींची थकबाकी असलेल्या अहमदनगरच्या मुळा प्रवरा वीज वितऱण संस्थेचं अस्तित्व अखेर संपलं आहे. सर्व वीज यंत्रणा महावितरणच्या हवाली करण्यास संस्थेचं व्यवस्थापन तयार झालं आहे. यासंदर्भात महावितरण आणि संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये बैठक झाली आणि त्यात हा तोडगा निघाला. तर संस्थेच्या सोळाशे कर्मचार्‍यांबाबतचा निर्णय सरकारची समिती घेणार असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. महावितरणनं या प्रकरणी मुळाप्रवराला आज नोटीस बजावली होती. वीज पुरवठा करण्याची सर्व यंत्रणा दुपारी 3 वाजेपर्यंत महावितरणच्या हवाली करा असं नोटिशीत म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुळा-प्रवराचा ताबा महावितरणकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुळा प्रवरा खोर्‍यातल्या राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या 183 गावांमधील दीड लाख वीज ग्राहकांना मुळा प्रवरा संस्थेकडून वीज पुरवली जात होती. यासाठी लागणारी सुमारे 100 मेगावॅट वीज महावितरण मुळाप्रवराला पुरवत होतं. पण आता मुळा प्रवरा संस्थेचा परवाना सोमवारी मध्यरात्रीपासून महावितरणकडे हस्तांतर करण्याचे आदेश असल्याने महावितरण आज मध्यरात्रीपासून मुळा प्रवराच्या ग्राहकांना स्वत:चे ग्राहक म्हणून वीज पुरवणार आहे.

पवार विरूध्द विखे अशा वादातून कारवाई झालेली नाही – उपमुख्यमंत्री

दरम्यान, मुळा प्रवरावरील कारवाई म्हणजे वीज दर नियमन आयोगाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर केलेली कारवाई आहे. पवार विरूध्द विखे अशा वादातून ती झालेली नाही. आता त्यांना वाईट सवयी लागलेल्या असतील तर त्यावर पांघरूण घालण्यासाठी ते आरोप करतील असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांना दिलं. औरंगाबाद इथं मराठवाड्यातील जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

close