नाशिकमध्ये कंत्राटदार हत्या प्रकरणातील आरोपी मोकाटच !

February 2, 2011 10:55 AM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक.

02 फेब्रुवारी

महिना उलटून गेला तरी नाशिक पोलिस राखमाफियावर कारवाई करू शकलेले नाहीत. 2 जानेवारीला नाशिकमध्ये एकलहरे विद्युत केंद्राच्या राखेच्या कंत्राटावरून दीपक आहेर या तरुणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे यातला मुख्य आरोपी शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख आहे. मात्र महिना उलटल्यानंतरही पोलिस त्याला शोधू शकलेले नाहीत.

दीपक आहेरनं एकलहरेतल्या विद्युत केंद्राच्या राखेच्या कॉन्ट्रॅक्टचं टेंडर भरले. पण ते मिळण्याआधीच दीपकची हत्या करण्यात आली. आणि यात सध्याचा ठेकेदार विशाल संगमनेरे हा मुख्य आरोपी आहे 2 जानेवारीला रात्री दीपकला मारण्यात आलं. गेटवर ड्युटीला असणारे दादाजी आहेर त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही आहेत. दादाजी आहेर म्हणतात की, मी ड्युटीवर असताना अण्णा संगमनेरे आणि त्याच्या साथीदारांना मी मोटारसायकलवर जाताना पाहिले. थोड्यावेळानं खबर आली. मी तेथे गेलो तर दीपकला मारत होते. ओरडलो तर हत्यारं टाकून पळून गेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी चौघांना अटक केली पण मुख्य आरोपी विशाल संगमनेरेसह चौघे फरार आहेत. दरम्यान विशाल संगमनेरेवर या नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत हाफमर्डर, मारामार्‍या, तोडफोडी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हद्दपारीच्या केसमध्ये दीपकनं जबानी दिली त्यावेळीही विशालनं त्यावर खुनी हल्ला केला होता. तरीही पोलिसांनी विशालवर कोणतीही कडक कारवाई केली नाही. उलट शिवसेनेनं त्याला उपतालुकाप्रमुखपद देवून त्याच्या गुंडगिरीला प्रोत्साहनच दिलं. नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये विशालवर आतापर्यंत कलम 307, 325, 326 या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. पण त्याबद्दल त्याच्यावर कारवाई होण्याऐवजी, त्याला शिवसेनेनं उपतालुकाप्रमुखपद बहाल केलं. आता प्रश्न उरतात ते नाशिकरोड पोलिस विशालला केव्हा अटक करणार आणि शिवसेना त्यांच्या या गुंड पदाधिकार्‍यावर काय कारवाई करणार ?

close