ग्रामीण आरोग्य अभियानाचे तीन तेरा !

February 2, 2011 4:56 PM0 commentsViews: 9

02 फेब्रुवारी

तुषार नगरकर, ठाणे

सर्वांसाठी आरोग्य.. याचा जयघोष करत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झालं. कोट्यावधी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला. पण प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्थेचं आरोग्य काही सुधारलं नाही.

ठाणे जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातलं आसे प्राथमिक आरोग्य केंद्र. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कष्टकरी संघटनेतर्फे इथे आरोग्यसेवेबद्दल जनसुनावणी घेण्यात आली. आणि आरोग्यसेवा मिळवण्यात तिथं येणार्‍या अडचणींचा पाढाच स्थानिक आदिवासींनी तिथे वाचला. यावेळी इथल्या डॉक्टर्सनी रुग्णांकडून पैसे मागितल्याची चक्क कबुली दिली. पण गेल्या दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने ही वेळ आल्याचं स्पष्टीकरणही दिलं. विशेष म्हणजे ही जनसुनावणी ज्या आसे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली त्याची अवस्था तर ग्रामीण आरोग्याच्या स्थितीवर खरा प्रकाश टाकणारी आहेत. तुटलेल्या पाईपललाईन, उखडलेल्या फरशा, आस्ताव्यस्त पसरलेलं साहित्य ना लाईटचा पत्ता ना पाण्याचा. गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट बांधलेल्या या आरोग्य केंद्रातून दिली जाणारी आरोग्य सेवा कशी असेल याची कल्पनाच अंगावर शहारा आणते. एनआरएचएमअंतर्गत मिळालेली गाडी तर पीएचसीच्या अंगणात भंगार बनून उभी आहेत. तसेच या केंद्रात 12 पैकी फक्त 3 नर्सेस काम करतात. 9 पदं तर रिक्त. जे मेजिडल ऑफीसर्स आहेत त्यांनाही दोन महिन्यांचं मानधन नाही.औषधांचा तर पत्ताच नाही. बालमृत्यूंसाठी संवेदनशील असलेल्या मोखाड्यातलीही अवस्था अशी असेल तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा काय उपयोग?

close