इजिप्तमध्ये जोरदार धुमश्चक्रीत 6 जणांचा मृत्यू; 800 जखमी

February 3, 2011 10:00 AM0 commentsViews: 7

03 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये होस्ने मुबारक यांच्याविरुद्धच्या आंदोलनानं आज सकाळी हिंसक वळण घेतलं. ताहिर चौकात सकाळी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 600 जण जखमी झाले आहे. यामध्ये काही पत्रकारही आहेत. मुबारक यांनी पद सोडवण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत मागितली. तर जनतेनं मात्र त्यांना ताबडतोब पद सोडण्यास सांगितलं आहे.आंदोलनकर्त्यांनी मुबारक यांना पद सोडण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत हा हिंसाचार आणखी वाढू शकतो. दरम्यान इजिप्तमधल्या भारतीयांना घेऊन येणारं एअर इंडियाचे तिसर विमान थोड्या वेळापूर्वीच मुंबईत पोहोचलं आहे. या विमानातून एकूण 212 भारतीय परतले आहेत. तर आतापर्यंत 550 भारतीय मायदेशात परतले आहेत.

इजिप्तमधली परिस्थिती आज चांगलीच चिघळली. राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना विरोध करणार्‍या आणि पाठिंबा देणार्‍या लोकांमध्ये कैरो शहरात संघर्ष पेटला आहे. इजिप्तच्या पंतप्रधानांनी विरोधकांना चर्चेचं निमंत्रण देऊन हिंसा थांबवण्याचे आवाहन केलं आहे. आपण किंवा आपला मुलगा निवडणूक लढवणार नसल्याचे मुबारक यांनी नुकतंच जाहीर केलं. पण तरीही कैरोच्या तहरीर चौकात गोळीबार सुरूच आहे.

इजिप्तमधली परिस्थिती झपाट्याने हाताबाहेर चालली आहे. आधी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना विरोध करणारी निदर्शनं शांतपणे सुरू होती. पण गेल्या 24 तासांत मुबारक यांना पाठिंबा देणारे हजारो नागरीकही रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुबारक समर्थक आणि विरोधकांत तुंबळ हाणामारीला सुरवात झाली. निदर्शकांच्या वाढत्या दबावामुळे होस्नी मुबारक यांनी सप्टेंबरमध्ये पायउतार होण्याची तयारी दाखवली.पण मुबारक यांच्या भाषणानंतरही अलबरदेई आणि मुस्लिम ब्रदरहुड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली निदर्शकं सुरूच राहिली. मुबारक यांनी ताबडतोब पायउतार व्हावं अशी निदर्शकांची मागणी आहे. त्यांनी मुबारक यांच्यासाठी शुक्रवारची डेडलाईन ठेवली. इतके दिवस तटस्थ राहिलेल्या लष्कराने आता हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मुबारक विरोधक आणि समर्थकांना अलग करण्यासाठी त्यांच्यामध्ये रणगाडे उभे केले जातायत. इजिप्तच्या पंतप्रधानांनीही हिंसा थांबवण्याचं आवाहन केलं असून विरोधकांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.

पण या आवाहनानंतरही कैरोमध्ये हिंसा सुरूच आहे. आणि शुक्रवारी डेडलाईन संपत असल्यामुळे जोरदार निदर्शनं अपेक्षित आहेत. त्यामुळे इजिप्त आता टाईमबाँबवर बसला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

पत्रकारांवरही हल्ले

इजिप्तमधली उलथापलथ कव्हर करण्यासाठी जगभरातून सुमारे तीन हजार पत्रकार गेलेत. पण यातले अनेक पत्रकार तिथल्या संघर्षात अडकले आहेत. काहींवर निदर्शकांनी हल्ले केले. तर अनेकांना पोलिसांनी किंवा लष्कराने ताब्यात घेतलं आहे. आयबीएन नेटवर्कच्या राजेश भारद्वाज यांना सुद्धा काही वेळापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यांचं ओळखपत्र आणि टेप्स जाळण्यात आल्या आहेत. त्यांना आता सोडलं असलं तरी अनेक पत्रकार अजूनही अटकेत आहेत.

सीएनएन या अमेरिकन न्यूजचॅनलच्या रिपोर्टर हाला गोरानी या बातम्या गोळा करत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. अमेरिका होस्नी मुबारक यांना पाठिंबा देतंय् असा आरोप करून मुबारक विरोधक पाश्चिमात्य मीडियावर हल्ले करत आहे. सीएनएनचे वरिष्ठ संपादक अँडरसन कूपर यांच्यावरही काही वेळातच हल्ला करण्यात आला. नंतर बीबीसी या ब्रिटिश वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. पण मुबारक यांच्या पोलिसांचा खरा त्रास होतो. तो अल जझीरा वाहिनीला. या चॅनलच्या सर्व सहा पत्रकारांची धरपकड सुरू आहे. लोकांच्या, पोलिसांच्या आणि लष्काराच्या या तिहेरी हल्ल्यांतून भारतीय पत्रकारही बचावले नाही. आयबीएन नेटवर्कचे व्हीडिओ जर्नलिस्ट राजेश भारद्वाज यांना अज्ञात लोकांनी काही वेळासाठी ताब्यात घेतलं. त्यांचं ओळखपत्र आणि टेप्स जाळण्यात आल्या. नंतर धमकी देऊन त्यांना सोडण्यात आलं.

close