मुबारक यांचा राजीनाम्याला नकार ; पत्रकारांवर हल्ले सुरूच

February 4, 2011 4:42 PM0 commentsViews: 9

04 फेब्रुवारी

इजिप्तमधल्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना पायउतार होण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. पण मुबारक यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. आपण राजीनामा दिला तर देशात यादवी माजेल असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आज 11 व्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र झालंय. मुबारक यांचे विरोधक तहरीर चौकात लाखोंच्या संख्येनं जमले आहेत. त्यांनी मुबारक यांच्या राजवाड्याच्या दिशेनं मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्याही मोठी आहे. तहरीर चौकातच शुक्रवारची नमाझ अदा केल्यानंतर आंदोलकांनी निदर्शनं तीव्र केली. दरम्यान लष्कराच्या रणगाड्यांनी तहरीर चौकाला घेरलं. त्यांनी जनतेच्या या आंदोलनाला पाठिंबाही दिला. इजिप्तचे संरक्षण मंत्री हुसेन तंतावी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज सकाळी तहरीर चौकात जाऊन निदर्शकांची भेट घेतली. आतापर्यंत या आंदोलनात 5 हजार जण जखमी झाले आहेत. इजिप्तमधलं आणखी एक शहर अलेक्झांड्रियामध्येही लाखो लोक आंदोलन करत आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी मात्र या आंदोलनाबद्दल मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेला जबाबदार धरलं आहे. मुबारक यांच्याशी चर्चा करायला मुस्लीम ब्रदरहूडनं तयारी दाखवली. पण पहिल्यांदा मुबारकनी राजीनामा द्यायला हवा अशी अट त्यांनी घातली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांचे प्रशासनही सत्तांतर करण्याबद्दल इजिप्त सरकारशी चर्चा करतंय. मुबारक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि सत्ता उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलेमान यांच्याकडे सोपवावी असा अमेरिकेचा प्रस्ताव आहे. सुलेमान यांना लष्कर, प्रशासन आणि अरब देशांतल्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं समजतं आहे. दुसरीकडे, शुरा काऊन्सिल या इजिप्तच्या वरिष्ठ सभागृहातल्या सत्ताधारी पक्षाच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहे. त्यांनी निदर्शकांना आपला पाठिंबा दिला.

पत्रकारांवर हल्ले सुरूच !

इजिप्तमधलं हे आंदोलन जगासमोर येऊ नये यासाठी होस्नी मुबारक सरकारचा खटाटोप सुरू आहे. पत्रकारांवर आणि मीडियाच्या ऑफिसेसवर हल्ले होत आहे. भारत आणि अमेरिकेनं या हल्ल्यांचा निषेध केला आहे. भारताने इजिप्तमधल्या लोकशाहीला पाठिंबा व्यक्त केला.

आंदोलन कव्हर करण्यासाठी कैरोत जमलेल्या जगभरातले पत्रकारांवरच शुक्रवारी सकाळपासून मुबारक यांच्या सरकारनं कारवाई करायला सुरूवात केली. अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं. सीएनएन-आयबीएनचे फॉरेन अफेअर्स एडिटर सूर्या गंगाधरन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश भारद्वाज यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आलं. अल जझिराच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला. या दडपशाहीचा भारतानं निषेध केला आणि तिथल्या लोकशाहीला पाठिंबा दिला.

close