पोलिसांच्या मारहाणीत 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

February 5, 2011 11:59 AM0 commentsViews: 4

05 फेब्रुवारी

हिंगोली जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीत 62 वर्षीय विमल जैस्वाल या महिलेचा मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यातल्या भोसी इथं ही घटना घडली. अवैध दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी या महिलेला मारहाण केली होती. या प्रकरणात चार पोलिसांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. यात एका पीएसआयचाही समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक केशव पाटील यांनी विशेष पथक स्थापन केलं. या पथकातील पोलीस तपासासाठी गेले असता विमल जैस्वाल आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या पथकातील पीएसआय दशरथ वाघमोडे, कर्मचारी किशोर कातकाडे, रणजित मारग आणि शेख शमी यांनी विमल जैस्वाल यांना मारहाण केली. आणि त्यानंतर विमल यांचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या मुलाने केला. हे पोलीस कर्मचारी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा गावकर्‍यांनी या पोलिसांना पकडून एका खोलीत कोंडून ठेवलं आणि पोलिसांना मारहाणही केली. त्यानंतर पोलिसांचा आणखी एक ताफा भोसीमध्ये दाखल झाला. विमल यांच्या सून उर्मिला जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला. तर वाघमोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन भोसे इथल्या 40-50 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

close