कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये -राणे

February 5, 2011 5:36 PM0 commentsViews: 7

दिनेस केळूसकर, रत्नागिरी

05 फेब्रुवारी

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांसह या भागाचा दौरा केला. राणे यांनी मिठगवाणे आणि साखरी नाटे गावात सभा घेतल्या. प्रकल्पग्रस्तांनी विरोधाचं राजकारण करुन कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी दिला. विरोध करूनही जर प्रकल्प येणारच असेल तर त्याचे फ़ायदे पदरात पाडून घ्या असा सल्लाही यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जैतापूर प्रकल्पस्थळाचा दौरा केला. त्यांच्या या दौर्‍यात त्यांच्यासोबत होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून आलेले हजारो कार्यकर्ते. खर्‍या प्रकल्पग्रस्तांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा या दौर्‍यात अधिक होता. राणेंची पहिली सभा झाली मिठगवाणे गावात. या सभेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रतिसाद अगदीच अल्प होता. या अल्प उपस्थितीबद्दल बोलताना राणे यांनी विकासाच्या आड प्रकल्पग्रस्तांनी येण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला. राणे म्हणता की, " काही लोक आले नसतील.. येतील आता नाही थोड्या वेळाने भेटतील शेवटी कोकणात रहायचं आहे. लग्न कार्य असतं. लपून चालतनाही ..लपलं छपलम तरी उद्योग धंद्यासाठी बाजारात यावं लागतं. काही करू नका ..मांजरीसारखे आडवे येऊ नका …आणी मी कोनाचं आडवेपण जुमानणारा नाही. विकासासाठी मी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. "

राणे यांनी आपली दुसरी सभा साखरी नाटे गावात घेतली. या सभेला मात्र स्थानिक मच्छीमारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक मच्छीमारांच्या नेत्यांनी या प्रकल्पामुळे मासेमारीवर होणार्‍या परिणामाबद्दलचे आपले प्रश्न यावेळी विचारले. त्याला राणेनी उत्तरं दिली.मला सांगायला यायची गरजच काय हो..? किती जरी विरोध केला तरी प्रकल्प होणारच आहे. पण मी म्हणतो प्रक्ल्प होणार असेल तर माझ्यालोकांना त्याचा फ़ायदा मिळून दिला पाहिजे.."

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले. प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनाही अटक करण्यात आली. अशा परिस्थितीत शंका निरसनासाठी आपले हजारो कार्यकर्ते घेऊन उद्योगमंत्र्यांनी हा दौरा केला. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांचं मतपरीवर्तन झालं की नाही हे महीनाखेरीस होणार्‍या मुख्यमंत्र्याच्या दौ-यात स्पष्ट होईल.

close