कांदा निर्यातबंदी उठवण्याची विनंती !

February 10, 2011 9:38 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारीकांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची विनंती राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. त्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. त्याचबरोबर पणन महासंघाकडे 1 लाख टन कांद्याची ऑर्डर आहे त्यामुळे निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार ट्रॅक्टर कांदा लिलावाविना पडून आहे. क्विंटलला किमान 1500 रु भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा विकणार नाही अशी शेतकर्‍यांची भूमिका आहे. लासलगाव बाजार समितीनं बोलावलेल्या बैठकीतही यावर काहीही तोडगा निघाला नाही.त्यामुळे आता समितीने राज्य सरकारशी संपर्क साधला आहे. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

तर पुण्यातल्या मार्केटयार्डमध्ये शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. भाव गडगडल्याने त्यांनी चारही दिशेन मार्केटयार्ड बंद केले होते. कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी लिलाव बंद पाडले होते. पण त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता होती. अखेर व्यापारी, दलाल आणि शेतकर्‍यांच्या बैठकीनुसार आंदोलन मागे घेतलं आहे. येत्या 2 दिवसात हमीभाव आणि निर्यातबंदी उठवण्याबाबत निर्णय झाला नाही, तर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा शेतकरी घेणार आहे. तर दूसरीकडे राज्यातल्या संतप्त शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली. कांद्याचे भाव पडल्यामुळे, अहमदनगर कृषी उत्पादन बाजार समिती समोर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. पुणे-औरंगाबाद रोड त्यांनी बंद पाडला आहे

close