वानखेडे स्टेडियमकडून पर्यावरणाचं उल्लंघन – सिंग

February 10, 2011 4:53 PM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

मुंबईतले वानखेडे स्टेडियमचे नुतनिकरण करताना पर्यावरण नियमांचं उल्लंघन झालं आहे असा गंभीर आरोप वाय.पी. सिंग यांनी केला आहे. उपलब्ध जागा नसतानाही खोटी माहिती देऊन परवानगी मिळविण्यात आली होती, एखादी दुर्घटना घडल्यास स्टेडियम 2 मिनिटांमध्ये खाली व्हायला पाहिजे असा नियम आहे. मात्र ते इथं शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं. फायर सेफ्टीचेही नियम पाळण्यात आले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

वर्ल्डकपचे काऊंटडाऊन सुरू झालंय आणि वानखेडे स्टेडियम अडचणीत आलं. नूतनीकरणाच्या कामात अनेक नियमांचं पालन झालं नाही असा आरोप माजी पोलिस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी केला. वाय.पी. सिंग यांनी वेगवेगळ्या प्रकारची 48 उल्लंघन झाल्याचा दावा केला.

यामध्ये 23 डिसेंबर 2007 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत झिरो ओपन स्पेस चा निर्णय घेतला जाणे तसेच एमसीएने सादर केलेल्या प्लॅनप्रमाणे वानखेडेला 4 इमर्जन्सी एक्झिस्ट दरवाजे न ठेवता फक्त एकच ठेवला आहे.

प्लॅनमध्ये 3370 गाड्यांचे पार्किंग दाखवूनही एकाही गाडीसाठीच्या पार्किंगची व्यवस्था न करणे शिवाय याच सबबीखाली पर्यावरण खात्याची परवानगी मिळवणे 1973 साली वानखेडे पहील्यांदा बांधलं जात असताना जे कायदे पाळले गेले नाहीत तसेच ते यावेळीही पाळले जाणार नाहीत यासाठी राजकीय दबाव वापरणे हे महत्त्वाचे आक्षेप आहेत.

वर्ल्ड कपची फायनल वानखेडेवर होणार आहे. पण जोपर्यंत या अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत इथे काहीही करायला परवानगी देऊ नये अशी विनंतीही वाय.पी सिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रशासनाला केली.

close