नाशिक कांदा मार्केट बंद करण्याचा निर्णय !

February 10, 2011 1:11 PM0 commentsViews: 14

10 फेब्रुवारी

गेले काही दिवस कांद्याच्या दरावरुन सुरु असलेला प्रश्न आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. उद्या शुक्रवारपासून नाशिक जिल्हातील सर्व कांदा मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आणि व्यापारी संघटनांनी एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार ट्रॅक्टर कांदा लिलावाविना पडून आहे. क्विंटलला किमान 1500 रु भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा विकणार नाही अशी शेतकर्‍यांची भूमिका आहे. लासलगाव बाजार समितीनं आज बोलावलेल्या बैठकीतही यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे समितीनं राज्य सरकारशी संपर्क साधला होता. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कांद्यावरची निर्यातबंदी उठेपर्यंत सर्व मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी आणि व्यापार्‍यांनी घेतला आहे.

दरम्यान, पुण्यातल्या मार्केटयार्डमध्ये शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. भाव गडगडल्याने त्यांनी चारही दिशेन मार्केटयार्ड बंद केलं होतं. कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी लिलाव बंद पाडले होते. पण त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता होती. अखेर व्यापारी, दलाल आणि शेतकर्‍यांच्या बैठकीनुसार आंदोलन मागे घेण्यातआलं आहे. येत्या 2 दिवसात हमीभाव आणि निर्यातबंदी उठवण्याबाबत निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा शेतकरी घेणारे आहे. तर याच मुद्यावर राज्यातल्या संतप्त शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळे अहमदनगर कृषी उत्पादन बाजार समितीसमोर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. तर पुणे-औरंगाबाद रोड त्यांनी काहीकाळ बंद पाडला होता.

close