औरंगाबादमध्ये खंडणीखोर नगरसेवकांना अटक

February 11, 2011 10:12 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

जमीन मालकाला ब्लॅकमेलिंग करून वीस लाख रूपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांंनी आज काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल साजेद अब्दुल सत्तार, यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरेसवक खलीलखान आणि इब्राहीम पटेल या तिघांना अटक केली आहे. अब्दुल साजेद यांच्यासाठी वीस लाखांची खंडणी घेताना महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक अन्वरखान याला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.

वीस लाखांच्या खंंडणी प्रकरणात जामिनासाठीचे अब्दुल साजेद, खलील खान आणि इब्राहिम पटेल यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सर्वोच्च न्यायालायपर्यंत दाद मागूनही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी या तिघांना शुक्रवारी सकाळी अटक केली. महानगरपालिकेचा इमारत निरीक्षक अन्वरखान याला जमीन मालक अन्वर कादरी यांच्याकडून वीस लाख रूपये घेताना 14 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. इतक्या मोठ्या रकमेची खंडणी इमारत निरीक्षक कुणाच्या आदेशावरून मागतोय याविषयी पोलिसांनी सापळा लावून काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल साजेद हेच या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक खलील खान व काँग्रेसचे कार्यकर्ते इब्राहीम पटेल यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे फोनवरील संभाषणावरून स्पष्ट झालं होतं. अब्दुल साजेद यांना अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

close