सोनवणेंच्या मारेकर्‍यांवर मोक्का !

February 11, 2011 2:03 PM0 commentsViews: 8

11 फेब्रुवारी

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरण घडलं होतं. या प्रकरणी काही तासातच सर्व 11 आरोपींना अटक ही करण्यात आली होती. आज या प्रकरणी गृहमंत्रालयानं 15 तेल माफियांना मोक्का लावला आहे. यामध्ये सोनवणे हत्याकांडातल्या 10 प्रमुख आरोपींसह 4 बड्या तेलमाफियांचा समावेश आहे. तेल भेसळीसंदर्भात निलंबित करण्यात आलेले पोलिस अधिकारी जगन पिंपळे यांच्यासह तेलमाफिया धीरज येवले, मदन ठाकूर आणि गटालिया यांचा यात समावेश आहे. त्याशिवाय सोनवणे हत्याकांडातला मुख्य आरोपी पोपट शिंदे, राजू शिरसाट, कुणाल शिंदे या 10 आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. पोपट शिंदेचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर बाकी आरोपी सध्या नाशिक रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी लोकशाहीला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडली. नाशिकचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोलच्या भेसळखोर माफियांनी जिवंत जाळलं. या घटनेत यशवंत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. चांदवडहून नांदगावला तहसीलदारांच्या बैठकीसाठी जात होते. या प्रवासादरम्यान, मनमाड पासून 10 किलोमीटर अंतरावरच्या पानेवाडी शिवार इथल्या एका ढाब्यावर त्यांना काही टँकर्स दिसले. या संपूर्ण भागात मोठ्या संख्येने ऑईल टँक आणि ऑईल डेपो आहेत. इथं संशयित हालचाल वाटल्यामुळे या प्रकरणाची अधिक पाहणी करण्यासाठी सोनवणे तिथं गेले. पोपट शिंदे याचा हा ढाबा होता. सोनवणे जेव्हा पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा पोपट शिंदे आणि त्याच्या सहा गुंडांनी सोनवणे यांच्यावर हल्ला केला. त्यांना ते ढाब्याच्या मागील शेतात घेऊन गेले. तिथं त्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून सोनवणे यांना पेटवून दिलं.कर्तव्य बजावत असताना सोनवणे यांचा जळून जागीच मृत्यू झाला.

close