गायक राहत यांची अखेर सुटका ; भारत सोडून जाण्यास मनाई

February 14, 2011 2:49 PM0 commentsViews:

14 फेब्रुवारी

प्रसिध्द पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांची अखेर सुटका झाली आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाकडून राहत चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करतील या अटीवरच सध्या राहत यांना सोडण्यात आलं आहे. राहत फतेह अली खान यांना सध्या सोडून देण्यात आलंय मात्र त्यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही. राहत यांचं पासपोर्ट आणि कागदपत्रं डीआरआयनं ताब्यात घेतली आहेत. शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत राहत देश सोडून जाऊ शकत नाहीत. एक लाख अमेरिकन डॉलर जवळ बाळगल्याबद्दल राहत फतेह अली खानला रविवारी रात्री दिल्ली विमानतळावर कस्टम्स अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी डीआरआय अर्थात डिरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सकडून त्यांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी एकूण 9 जणांना अटक झाली होती त्यातील राहत फतेह अली खान आणि दोन इव्हेंट मॅनेजर्स वगळता इतरांना काल रविवारीच सोडून देण्यात आलं होतं. प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्या चौकशीवरुन भारत-पाकिस्तानमध्ये राजनैतिक संबध चांगलेच ताणले गेले होते. पाकिस्तानने राहत यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली होती. राहत यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी हायकमिशनमधील 3 अधिकारी दिल्लीच्या डीआरआयच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. याच कार्यलयात राहत फतेह अली खान यांची काल रात्रीपासून चौकशी सुरु होती.

close