धोणीच्या जाहिरातीवरून रस्सीखेच !

February 15, 2011 11:24 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

भारतीय खेळाडू मानसिक दृष्ट्या दमले आहेत असं विधान करुन धोणीने काल मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. त्यातच आयसीसीच्या मार्केटिंग समितीचीही वक्रदृष्टी त्याच्यावर होऊ शकते. वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान सोनी ब्रावियो आणि एअरसेल कंपनीच्या जाहिराती धोणीने करु नये आणि त्या टिव्हीवर दाखवण्यात येऊ नये असं आयसीसीने धोणीला सुनावलं आहे. धोणी अर्थातच या कंपन्यांचा ब्रँड अँबेसिडर आहे. पण या कंपन्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रायोजक नाही. त्यामुळे खेळाडूंबरोबर केलेल्या मार्केटिंग कराराचा हा भंग आहे असं आयसीसीचं म्हणणं आहे. त्यांनी धोणीला खरमरीत पत्र पाठवून या जाहिराती स्पर्धे दरम्यान बंद कराव्यात असं म्हटलं आहे. तर सोनी कंपनीने मात्र आयसीसीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आयसीसीच्या कुठल्याही नियमाचा भंग त्यांनी किंवा कॅप्टन धोणीने केलेला नाही असंच त्यांचं म्हणणं आहे.

सोनी कंपनीकडून पत्रात स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, ब्रँड अँबेसिडर धोणीने जाहिरातींमध्ये टीमचा युनिफॉर्म घातलेला नाही. आयसीसीचा लोगो त्यांनी वापरलेला नाही. किंवा जाहिरातीत वर्ल्ड कप संबंधी कुठलंही वक्तव्य नाही किंवा त्याचा उल्लेखही नाही. डिसेंबरमध्ये आयसीसीने क्रिकेटर्ससाठी जाहिरातींची मार्गदर्शक तत्त्व जारी केली. सोनी कंपनीने लगेचच त्यातल्या काही तत्त्वांवर आक्षेप नोंदवला होता. आणि आयसीसीकडे लेखी विचारणा केली होती. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन सोनी ब्रावियोची जाहिरात तयार केली असा दावा सोनी कंपनीने केला आहे.

close