रत्नागिरी शहरात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा

November 5, 2008 2:56 PM0 commentsViews: 16

5 नोव्हेंबर, रत्नागिरी सिटीझन जर्नालिस्ट दिलीप साठेरत्नागिरी शहराच्या सांडपाणी व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेला रहिवाशांच्या या समस्येबद्दल आस्था नाही. आयबीएन- लोकमतचे सिटीझन जर्नलिस्ट दिलीप साठे यांचा हा रिपोर्ट.रत्नागिरी शहरातील सांडपाणी वाहून नेणारं मुख्य गटाराचा परिसर पर्‍याची आळी म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतलं हे मुख्य गटार एक किलोमीटरहून जास्त अंतर उघडच आहे. सांडपाण्याबरोबरच कचरा कुंड्यांची व्यवस्था नसल्यमुळे रहिवाशांना याच गटारात कचराही टाकावा लागतो. या सगळ्याचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. ' नाल्याच्या बाजूला असलेल्या विहिरींमध्ये दूषित पाणी जे जातंय आणि मच्छरचा त्रास भरपूर प्रमाणात होतो. जर हे बंद केलं तर बरं होईल. लोकाचं आजारी असण्याचं प्रमाण वाढलंय ', असं तिथले रहिवाशी विजय शेटे यांनी सांगितलं. नियम असुनही रत्नागिरी शहरात उभ्या राहणार्‍या इमारतींसाठी भूमिगत गटारांची व्यवस्था बिल्डर करत नाहीत. त्यामुळे या सगळ्या इमारतींचं सांडपाणीही अनेक रहिवाशांच्या घरापर्यंत येतं. विनंत्या तक्रारी करूनही नगरपालिका लक्ष देत नाही. ' इथे चाळीस एक बिल्डिंग्ज आहेत आणि 201 ब्लॉक्स आहेत. त्यावेळेला त्या बिल्डरला अशी अट घातली होती की, तुमचचं हे सांडपाणी आहे ते नदीला नेऊन सोडायचं पण बिल्डरने शॉर्टकट काढला आणि इथून हे गटार काढलं', असं संजय शेठ सांगत होते.रत्नागिरीत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही राबवलं गेलं पण ते कागदावरच. प्रत्यक्षात काहीच होत नाही. रहिवाशी आपल्या समस्या वेळोवेळी नगरसेवकांना सांगतात. मात्र नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेल्या महायुतीमुळे विरोधी पक्ष आपला चेहरा हरवून बसला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना कोणीही वाली नाही.

close