वाळूमाफियाची दादागिरी

February 15, 2011 4:12 PM0 commentsViews: 11

15 फेब्रुवारी

नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचं जळीत हत्याकांड अजून ताजं असतानाच राज्यात वाळू माफियांची मुजोरी मात्र कायम आहे. याप्रकरणावरुन सरकारने अजून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. याचा सज्जड पुरावा आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. पुणे जिल्ह्यातली ही घटना आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक रामशेठ काळे आहे. राम काळे हा राष्ट्रवादीच्या आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमधला एक महत्वाचा कार्यकर्ता आहे.

दिलीप वळसे पाटलांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर राम काळे गेली तीन वर्ष संचालक आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर घोडेगाव गटातुन निवडणुकीला उभा राहिला होता. घोडेगावमध्ये त्याचे देशी आणि विदेशी दारुचे धंदे आहेत. पूर्वी त्याचा मटक्याचा धंदा होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तळेघर येथे मारामारी प्रकरणी आणि गाड्यांची मोडतोड केल्या प्रकरणी घोडेगाव पोलिस स्टेशनला त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

घोडेगावमध्ये वाळूमाफियांनी उच्छाद मांडलाय् हे बघून स्थानिक पत्रकार सचिन काळे यांनी त्याविरोधात आवाज उठवण्याचं ठरवलं. वाळूउपशासाठी यांत्रिक बोटींना का परवानगी दिली जातेय याचा छडा लावण्यासाठी सचिन काळे यांनी मायनिंग ऑफिसर म्हणजे खनिकर्म अधिकारी संजय बामणेंना फोन लावला.

पत्रकार सचिन काळे यांनी फोन करुन मायनिंग ऑफिसरकडे यांत्रिक बोटींना परवानगी कशी दिली अशी विचारणा केली आणि मग लगेचच सूत्रं फिरली आणि घोडेगावच्या सरपंचांनी सचिन काळेंना फोन केला. सरपंचांबरोबर होता वाळूमाफिया राम काळे याने सचिनला जीवे मारण्याची धमकी दिली.

आयबीएन लोकमतचे सरकारला सवाल

- दिलीप वळसे-पाटील आणि इतर स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांना राम काळेच्या या गैरप्रकारांविषयी कल्पना नव्हती का?- सोनवणे जळीतकांडानंतर राज्यभरात माफियांविरुध्द कारवाई झाली, मग आंबेगाव कारवाईपासून लांब कसं राहिलं?- उघडउघड धमक्या देणार्‍या या राम काळेवर आतातरी कारवाई होईल का?- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच वाळूमाफियांच्या रुपात धुडगूस घालतायत, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या मुजोरांवर बडगा उगारणार का?- कोणत्याही पक्षाच्या गुन्हेगाराची गय केली जाणार नाही, ही आपली घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री विसरले का?

close