इन्सुलिन प्रकरणी वोखार्डला अडीच लाखांचा दंड

February 17, 2011 3:00 PM0 commentsViews: 11

अलका धुपकर, मुंबई

17 फेब्रुवारी

वोखार्ड फार्मासिट्युकल या कंपनीने वोसुलिन नावाचं इन्सुलिन चुकीच्या पद्धतीने उत्पादन केलं होतं. एफडीएने कारवाई करुन ही संपूर्ण बॅच बाजारातून मागे घेण्याचे आदेश कंपनीला दिले होते. इन्सुलिनचे उत्पादन करणारी वोखार्ड ही जगातली चौथी मोठी कंपनी आहे. त्यामुळे 2006 साली केलेली ही चूक वोखार्डची फार्माला बरीच महागात पडली. मुंबईतील गोरेगाव भागात राहणारे शरद तांबे यांनी कंपनीच्या या चुकीविरोधात त्यांना जिल्हा ग्राहक न्यायालयात खेचलं होतं. आणि ग्राहक न्यायालयाने शरद तांबे यांच्या बाजूने नुकताच निकाल दिला आहे.

ज्येष्ठ नागरिक असलेल्या शरद तांबे यांनी आणि त्यांच्या वकिलांनी चार वर्ष चिकाटी सोडली नाही. अखेर अडीच लाख रुपयांचा दंड आणि तो सुद्धा सहा आठवड्यांमध्ये भरण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने वोखार्ड फार्माला दिला. चुकीच्या इन्सुलिनचं उत्पादन आणि विक्री करुन पेशंट्सच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल ग्राहक न्यायालयाने वोखार्डवर कडक ताशेरे ओढले.

प्लेन आणि कॉम्बिनेशन असे इन्सुलिनमध्ये दोन प्रकार आहेत. डायबिटीसच्या पेशंट्सनी चुकीचं इन्सुलिन घेतल्यास ते कोमात जाऊ शकतात. हा धोका माहित असल्यामुळेच शरद तांबे यांनी वोखार्ड विरोधात एफडीएकडे तक्रार केली होती.

1994 साली अरुण भाटिया एफडीएचे आयुक्त असताना त्यांनी पहिल्यांदा ग्लॅक्सो या फार्मासिट्युकल कंपनीवर कारवाई केली होती. त्यांनी 10 दिवसांसाठी ग्लॅक्सो बंद ठेवली होती. त्यानंतर एवढी मोठी कारवाई झाली ती वोखार्ड या फार्मा कंपनीवर. एफडीएने ही कंपनी 2 महिने बंद ठेवली होती. ती सुद्धा शरद तांबे यांंच्या तक्रारीनंततर. त्यामुळे शरद तांबे यांच्या लढ्यावरुन सध्या तरी एवढं म्हणू शकतो की जागतिकीकरणाच्या या काळात ग्राहक आपल्या हक्काबद्दल जागरुक असतील तर ते आपले हक्क नक्की मिळवू शकतात.

close