बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी असा ही प्रयत्न

February 18, 2011 3:42 PM0 commentsViews: 10

अजित मांढरे मुंबई

18 फेब्रुवारी

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस, मृतदेहांची ओळख पटावी या करता ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या मृतदेहांचे फोटो आणि त्यांच्या जवळ मिळालेल्या वस्तूंच एक प्रदर्शनात मांडण्यात आलं आहेत.

लिलादेवी यांचा मोठा मुलगा किशोर हा एक वर्षांपासून तर, छोटा मुलगा मंगेश गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता आहे. हे दोघं रेल्वेत वस्तू विकण्याचं काम करायचे आपल्या बेपत्ता मुलांचा शोध घेता घेता हे वृद्ध आई वडील वसईत ठाणे ग्रामीण पोलिसांनी भरवलेल्या या प्रदर्शनात येऊन पोहोचले. या ठिकाणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहांची ओळख पटावी याकरता मृतदेहांचे फोटो आणि त्यांच्या जवळ मिळालेल्या मुद्दे मालाचं प्रदर्शन भरवलं आहे.

ठाणे ग्रामिण पोलिसांच्या हद्दीत एकूण पाचशे पेक्षा जास्त अनोळखी मृतदेह आहेत. या अनोळखी मृतदेहांची ओळख पटावी या करता ठाणे ग्रामीण पोलिसांनी अशा प्रकारच प्रदर्शन भरवलं आहे. आणि जो पर्यंत या मृतदेहांची ओळख पटत नाही तो पर्यंत हे प्रदर्शन असचं सुरु राहणार आहे. राज्यभरातल्या सरकारी शवागृहात मृतदेह ठेवण्याची क्षमता जवळ जवळ संपुष्टात आलीय. त्यामुळे या शवागृहातल्या मृतदेहांची विल्हेवाट लवकरात लवकर न लावल्यास बेवारस मृतदेह ठेण्याची मोठी अडचण निर्माण होईल. या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक योजना आखाव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे ग्रामीण पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

close