नाशिक रोडचा गुंडाराज

February 16, 2011 6:22 PM0 commentsViews: 8

दीप्ती राऊत, नाशिक

16 फेब्रुवारी

नाशिक रोडमध्ये गेल्या तीन महिन्यात तीन खून झाले. यातले मुख्य आरोपी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी. या हत्यामध्ये तिसरी हत्या झाली. ती संदीप भालेरावची आणि त्यातला मुख्य आरोपी आहे शिरीष लवटे, भारतीय विद्यार्थी सेनेचा उपजिल्हाप्रमुख. दहा दिवस उलटले तरी त्याला नाशिकचे पोलीस शोधू शकलेले नाहीत. गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्‍या लवटे बंधूंमुळे नाशिकरोड परिसरातल्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.

नाशिकरोडमध्ये गेल्या तीन महिन्यात तीन युवकांची हत्या झाली.1 डिसेंबरला सुभाष सातपुते, 2 जानेवारीला दीपक आहेर आणि 4 फेब्रुवारीला सुभाष भालेराव या तीन जणांचा खून झाला. या खुनांमधले मुख्य आरोपी आहेत अंबादास ताजनपुरे, राहुल ताजनपुरे, विशाल संगमनेरे, कृष्णा लवटे आणि शिरीष लवटे या तिन्ही हत्याकांडाचील मुख्य आरोपी आहे.

विशेष म्हणजे नाशिकरोडमध्ये गेल्या तीन महिन्यात झालेल्या या तीन खुनांमधले मुख्य आरोपी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. खूनाच्या आरोपातील सर्व मुख्य आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहे. तसेच मुख्य आरोपी अंबादास ताजनपुरे हा शिवसेनेच्या नगरसेविका भारती ताजनपुरेचे पती आहेत. तर राहुल ताजनपुरे त्यांचा मुलगा आहे. आहेर खून प्रकरणातील आरोपी विशाल संगमनेरे हे शिवसेना तालुका उपप्रमुख आहे.

तसेच भालेराव खून प्रकरणात आरोपी कृष्णा लवटे, शिरीष लवटे हे दोघंही शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटेंचे सख्खे भाऊ आहेत. यातला फरार आरोपी शिरीष लवटे हा भारतीय विद्यार्थी सेनेचा उपजिल्हाप्रमुख आहे. बनावट दारू, मटके, जुगार यासारख्या अवैध धंद्यांच्या या शिवसेनाप्रणित माफियांची नाशिकरोड परिसरात प्रचंड दहशत आहे. यातल्या लवटे बंधूंना दोन वेळा तडीपारही करण्यात आलं होतं. मात्र राजकीय आशीर्वादामुळे त्यांची माफियागिरी सुरूच आहे.

मात्र रिक्षा चालवणार्‍या संदीपच्या गेल्यामुळे घरच्यांना आधार निखळला आहे. या गुन्हेगारीनं लहानग्या आदिती-आदित्यच्या डोक्यावरचं वडलांचं छत्र हिसकावलं. नागरिकांच्या रेट्यामुळे कृष्णाला ताब्यात घेणं पोलिसांना भाग पडलं. पण शिरीष अजूनही फरार आहे. दहा दिवस उलटून गेले तरीही नाशिकचे पोलीस शिरीष लवटेला अटक करू शकलेले नाही.

सिटीझन जर्नालिस्टचा खास रिपोर्ट

नाशिकरोडची रोकडोबा वाडी लवटेंच्या अवैध धंद्यांची बजबजपुरी बनली आहे. दूरदूरच्या हद्दपार गुंडांचं हे आश्रयस्थान झालं आहे. हे गुंड इथे खास वसवले जाताहेत. मटका, जुगार, दारू आणि भाईगिरी हाच यांचा धंदा आहे. यातलाच एक गुंड विनायकराव हा लवटेंचा खास माणूस आणि या विनायकरावने ज्या एरियात दहशत पसरवलीये तिथले नागरिक बाळासाहेब मते यांनीच आम्हाला या परिसरात फिरुन काळे धंदे कुठे चालतात याची माहिती दिली.

close