पराभवाचा वचपा काढत भारताची विजय सलामी

February 19, 2011 4:21 PM0 commentsViews: 7

19 फेब्रुवारी

बांगलादेशच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर भारतीय बॅट्समन शेरास सव्वाशेर ठरले. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. ओपनिंग मॅचमध्ये भारताने बांगलादेशचा 87 रन्सनं पराभव करत मिशन वर्ल्ड कपची पहिली पायरी पार केली आहे. सेहवाग आणि कोहलीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिली बॅटिंग करत 4 विकेटच्या मोबदल्यात 370 रन्सचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना बांगलादेशनंही चांगली लढत दिली. पण बांगलादेशला 9 विकेटवर 283 रन्स करता आले. ओपनर तामिम इक्बाल आणि इम्रुल कायसनं 56 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली. पण ही जोडी मुनाफ पटेलनं फोडली. कायस 34 रन्सवर आऊट झाला, तर तामिम इक्बालनं 70 रन्स केले.

यानंतर कॅप्टन शाकिब अल हसननं 55 रन्सची खेळी करत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण यात ते अपुरे पडले. याआधी वीरेंद्र सेहवागने 175 रन्सची धुवाँधार खेळी केली. यंदाच्या वर्ल्ड कपमधली पहिली सेंच्युरी त्याच्या नावावर जमा झाली. सेहवागला विराट कोहलीनं चांगली साथ दिली. त्याने नॉटआऊट सेंच्युरी ठोकली. सचिन तेंडुलकर 28 तर गौतम गंभीर 39 रन्सवर आऊट झाले. या विजयाबरोबर भारताने 2007 च्या वर्ल्ड कप पराभवाचा वचपाही काढला. मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र सेहवाग ठरला.

वर्ल्ड कपच्या सलामीच्या मॅचमध्येच भारतानं 370 रन्सचा डोंगर उभा करत बांगलादेशसमोर विजयासाठी 371 रन्सचं बलाढ्य टार्गेट ठेवलं आहे. भारतीय बॅटिंगचा हिरो ठरला तो धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवाग. सेहवाग नावाच्या वादळात बांगलादेशचे बॉलर अक्षरश उध्वस्त झाले.

वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचची फोरनं सुरुवात करणार्‍या सेहवागनं फोर आणि सिक्सची बरसात केली. अवघ्या 140 बॉलमध्ये त्यानं 175 रन्स केले. त्याला विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकत चांगली साथ दिली. वन डेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा विराट कोहली पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा खेळतोय आणि आपल्या पहिल्याच स्पर्धेत त्यानं सेंच्युरी ठोकली आहे. त्याआधी सचिन तेंडुलकर 28 रन्सवर तर गौतम गंभीर 39 रन्सवर आऊट झाले. बांगलादेशतर्फे शाकिब अल हसन, मोहम्मदउल्लानं, शफिऊल इस्लाम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सेहवागने केली कपीलदेवची बरोबरी

वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी मॅचमध्ये पूर्ण पन्नास ओव्हर्स खेळून काढण्याची इच्छा वीरेंद्र सेहवागने उघडपणे बोलून दाखवली होती. भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये तो फक्त दोन ओव्हरने चुकला. पण सेहवाग इतका वेळ टिकल्यावर ज्याची अपेक्षा आहे तसाच स्कोअरबोर्ड भारतीय टीमचा बघायला मिळतोय.

सेहवागने स्वत:ची दुसरी वर्ल्ड कप सेंच्युरी ठोकली आहे.आणि त्या ओघात कपिल देवचा 175 रनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. आपली सेंच्युरी त्याने पूर्ण केली ती 94 बॉलमध्ये आणि 140 बॉलमध्ये 175 रन करुन तो आऊट झाला. 5 सिक्स आणि 14 फोरची आतषबाजी त्याने केली.

वर्ल्डकपमधील सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी वीरेंद्र सेहवागला होती. पण तो 175 रन्सवर आऊट झाला. वर्ल्डकपमधील ही चौथ्या क्रमांकाची कामगिरी ठरली. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम गॅरी कर्स्टनच्या नावावर आहे. त्यानं युएई विरुध्द नाबाद 188 रन्स केले होते. हेच गॅरी कर्स्टन आता इंडियन टीमचे कोच आहेत. 183 रन्ससह दुसर्‍या क्रमांकावर गांगुली आहे. त्यानं श्रीलंकेविरुध्द ही कामगिरी केली होती. तिसर्‍या क्रमांकावर रिचर्ड आहे. त्यांनी श्रीलंकेविरुध्द 181 रन्स केले आहे. तर आता चौथ्या क्रमांकावर कपिलदेवसह वीरेंद्र सेहवाग आहे. कपिलनं झिम्बाब्वेविरुध्द 175 रन्सची नाबाद खेळी केली होती.

आणि सचिन रनआऊट झाला

आपली सहावी वर्ल्ड कप स्पर्धा खेळणार्‍या सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगवर सर्वांचंच लक्ष होतं. सचिन तेंडुलकरनं आपल्या पहिल्या मॅचमध्ये सुरुवातही धडाक्यात केली. वीरेंद्र सेहवागबरोबर त्यानं पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची पार्टनरशिप करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. या दोघांची जोडी मोठा स्कोर उभारणार असं वाटत असतानाच सचिन तेंडुलकर रनआऊट झाला. एकेरी रन्स काढण्याच्या नादात सचिन रनआऊट झाला. त्यानं 28 रन्स केले.

close