भारतीय अर्थव्यवस्थेला ओबामांकडून मोठ्या अपेक्षा

November 6, 2008 6:27 AM0 commentsViews: 9

6 नोव्हेंबर, दिल्लीबराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर आता त्याचा भारतावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ओबामा आऊटसोर्सिंगच्या विरोधात आहेत पण तरीही भारतीय इंडस्ट्रीला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.' निवडून आलो तर परदेशात काम पाठवणार्‍या कंपन्यांना टॅक्स सवलत देण्यापेक्षा देशात नव्या नोकर्‍या निर्माण करेन ', असं ओबामा यांनी म्हटलं होतं. आता लवकरच ओबामा व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याविषयी अर्थमंत्री पी चिदंबरम बरेच सकारात्मक होते. ' दोन्ही देशांमधले संबंध आणखी मजबूत होतील असा मला पूर्ण विश्वास आहे, आऊटसोर्सिंगवर दोन्ही देशांतून काय मतं व्यक्त केली गेली, याला महत्तवं देता कामा नये. जेव्हा ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतील तेव्हा त्यांना दोन्ही देशातल्या संबंधांची जाणीव होईल कारण अमेरिका ही जगातली एक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारत हा खुलं व्यापारी धोरण असणारा देश आहे. ' असं ते म्हणाले.भारतामध्ये एकूण 64 अब्ज डॉलर्सची आऊटसोर्सिंग इंडस्ट्री आहे. त्यातील 60 टक्के काम अमेरिकेकडून येतं. त्यामुळे नॅसकॉमची यासंदर्भातली मतं महत्त्वाची ठरतात. पण नॅसकॉमनेही ओबामांच्या विजयाविषयी आनंद व्यक्त केलाय. भारत – अमेरिका व्यापार ओबामा पुढे नेतील अशी नॅसकॉमला अपेक्षा आहे. ' भारत आणि अमेरिकेमधले आर्थिक संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत, आणि आताही ते चांगले रहातील असा आम्हाला विश्वास आहे ' अशी प्रतिक्रिया नॅसकॉमचे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी दिली.जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थव्यवस्था सावरणं हे ओबामांचं पहिलं काम असेल. वॉलस्ट्रीटसोबत मेनस्ट्रीटकडेही लक्ष द्यायला हवं असं म्हणतं त्यांनीही हे सूचित केलं आहे.

close