वर्ध्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत

November 6, 2008 7:47 AM0 commentsViews: 2

6 नोव्हेंबर, वर्धानरेंद्र मतेवर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आता वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागतंय. गेल्या वर्षभरात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी फक्त पाच आत्महत्यांना सरकार दरबारी पात्र ठरवण्यात आलं आहे. केवळ काही कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुले प्रशासनानं मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. रेखाबाई मोहितेंचे पती उत्तमराव यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पाच वर्षांपूर्वी विष घेऊन आत्महत्या केली होती. पण, सरकारनं ही आत्महत्याच अपात्र ठरवली आहे. आधीच घरचा आधार गेला आणि त्यात लालफितीचा आडमुठेपणा यामुळे मोहिते कुटुंबीयांसमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. सोसायटीचं कर्ज आणि वडिलांची आत्महत्या यामुळे त्यांच्या मुलांचं भवितव्यही धोक्यात आलंय. निसर्गाची साथ नाही आणि प्रशासनाकडून कोंडीत पकडलं जातंय, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे गाजावाज करत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर करायची, आणि नंतर लाल फितीच्या कारभारात ती अडकवून ठेवायची असा प्रकार वर्ध्यात चालला असल्याचं या प्रकारावरून स्पष्ट झालं आहे.

close