विद्यार्थी निवडणूका सुरु होण्याची शक्यता

February 24, 2011 2:14 PM0 commentsViews: 7

24 फेब्रुवारी

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी निवडणूका सुरु होऊ शकतात. या निवडणुकांमध्ये वाढलेल्या हिंसाचारामुळे 1991 पासून या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाने सशर्त बंदी घातली होती. पण आता राज्य सरकारने यासंदर्भातील लिंगडोह कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी दाखवली. विद्यार्थी निवडणुकांबद्दल माजी निवडणूक आयुक्त जे एम लिंगडोह यांनी 2006 साली आपल्या शिफारशी सुप्रीम कोर्टापुढे सादर केल्या आहेत.

यासंदर्भात रुईया कॉलेजमधील विशाल चव्हाणच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या 12 शहरांमधल्या विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. आणि बंद केलेल्या या निवडणूका पुन्हा सुरु करण्याची विनंती केली. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय निवडणूका सुरु करण्यासाठी कायद्यात बदल करण्याबद्दल सकारात्मक विचार करत आहे.

मात्र सरकारसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेऊन निर्णय घेतला जाईल. शिवाय सुप्रीम कोर्टाचीही परवानगी घेतली जाईल असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने या विद्यापीठ आणि कॉलेजमधल्या या निवडणूका राजकीय प्रक्रियेतील सहभागासाठी महत्वाच्या असल्याची विनंती टोपे यांना केली. निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचं वय 25 पेक्षा जास्त नसावं त्याची कॉलेजमधली हजेरी 75 टक्के असावी प्रत्येक उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त खर्च करु नये अशा शिफारशी त्यात सुचवण्यात आल्या आहेत.

close