ममतांची ‘बंगाल’ एक्सप्रेस !

February 25, 2011 4:51 PM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी

पश्चिम बंगाल निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ममता बॅनर्जी यांनी रेल्वे बजेट सादर केल्याची टीका आज राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर होत होती. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणार्‍या ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये बंगालला झुकतं माप दिलं आहे.

रेल्वेच्या बजेटनंतर त्याचं रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार समर्थन केलं. तर विरोधकांनी त्याला बंगाल पुरस्कृत बजेट असं म्हणत घोषणाबाजी केली. दोन महिन्यानंतर बंगालमध्ये निवडणुका होणार असल्याने त्याचं चित्र रेल्वे बजेटमध्ये पाह्यला मिळालं आहे.

ममतांची 'बंगाल' एक्स्प्रेस

- सिंगूरला मेट्रोचे डबे निर्मितीचा कारखाना- नंदीग्रामला रेल्वेचं औद्योगिक पार्क उभारणार – कोलकाता मेट्रोच्या 34 नव्या फेर्‍या सुरु करणार- कोलकाताच्या उपनगरीय सेवेच्या 50 नव्या फेर्‍या सुरु करणार- उलुबेरिया इथं ट्रॅक मशीनचा कारखाना उभारणार

अशाप्रकारे ममता दीदींनी पश्चिम बंगालसाठी हात मोकळाच सोडला. रेल्वे बजेटमध्ये केवळ आकडेवारीचा फुगवटा आहे, पण ममता दिदींच्या कारकिर्दीत रेल्वे दिवाळखोरीत निघत चालल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मात्र ममता दीदींची बाजू घेतली आहे. दिल्लीच्या रेलभवनमध्ये बसून बंगालच्या मतदारांना आकर्षित करणारे रेल्वे बजेट सादर केलंय. त्यामुळे दिदींना अपेक्षा आहे, की यामुळे कदाचित कोलकातामधल्या रायटर बिल्डिंगकडे जाण्याचा त्यांचा मार्ग अधिक सुकर होईल.

close