आ.वाघ निर्दोष असल्यास निलंबन मागे घेऊ – अजित पवार

February 26, 2011 3:43 PM0 commentsViews: 9

आशिष जाधव, नवी मुंबई

26 फेब्रुवारी

पाचोर्‍याचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने वाघ यांना पक्षातून निलंबित केलं. पण त्याचवेळी त्यांना पोलिसांपासून संरक्षण देण्याचं कामही राष्ट्रवादीकडून होतं आहे. म्हणूनच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत राज परिषद भरवली. पण या परिषदेवर आमदार दिलीप वाघ यांच्यावरील बलात्काराच्या गुन्ह्याच्या प्रकरणाचं सावट होतं. त्यामुळे परिषद सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने दिलीप वाघ यांना पक्षातून निलंबित केलं.शुक्रवारी दिलीप वाघ मुंबईत आले होते. पण ते आपल्या नेत्यांना भेटून गायब झाले.

त्यांचा पत्ता पोलिसांनाही लागत नाही. तर दुसरीकडे परिषदेच्याठिकाणी दिलीप वाघ यांचं निर्दोषत्त्व सिद्ध झालं तर त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेऊ असं हे स्पष्ट करायलाही उपमुख्यमंत्री अजित पवार विसरले नाहीत. पण विरोधी पक्षाला मात्र दिलीप वाघ प्रकरणी सीआयडी चौकशी हवी आहे.

दिलीप वाघ प्रकरणात राष्ट्रवादीच्या गृहखात्याला निपक्षपातीपणे कारवाई करावी लागेल. नाही तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होतील, हे मात्र नक्की.

close