राष्ट्रवादीनं निवडणुका स्वबळावर लढण्याचा नेत्यांचा आग्रह !

February 27, 2011 4:33 PM0 commentsViews: 2

आशिष जाधव नवी मुंबई

27 फेब्रुवारी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरु केल्याचा इशारा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीनं स्वबळावर लढावं अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली. तर काँग्रेसला खुमखुमी असल्यास राष्ट्रवादीनं स्वबळावरच लढलं पाहिजे असा आग्रह गृहमंत्र्यांनी धरला.

आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या होमवर्कसाठीच राष्ट्रवादीनं नवी मुंबईत पंचायत परिषद भरवली. यात पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र आले होते. त्यांनी एक एक करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. साहजिकच आगामी जिल्हापरिषद निवडणुका स्वबळावर का लढू नये, हा विषय अजेंड्यावर होता.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळं राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांवर उपमुख्यमंत्र्यांनी दावा ठोकला. पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात जिल्हापरिषद निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे, असा आग्रह गृहमंत्र्यांनी धरला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जम बसवलेल्या दादा आणि आबांनी स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष तरी कसे मागे राहतील. त्यांनी स्वबळाचीच री ओढून पक्षाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं.

निवडणुकांना एका वर्षाचा अवधी आहे. पण आतापासून स्वबळाची भाषा करून राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या या दबावतंत्राला बळी पडायचं नाही, असं काँग्रेसनं ठरवलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने येतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे.

close