पैसा- प्रसिद्धी सर्व काही महाराष्ट्रानं दिलं- जफर सुलतान

November 6, 2008 1:16 PM0 commentsViews: 6

6 नोव्हेंबर, मुंबई भाग्यश्री वंजारीमराठी अमराठी वादाचे तीव्र पडसाद अजुनही उमटत आहेत. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रानं आपल्याला मोठं केल्याची कृतज्ञ भावना अनेक अमराठी कलाकार व्यक्त करतात. मराठी सिनेमांचे आघाडीचे एडिटर जफर सुलतान यापैकीच एक. अशा मुंबईकरांची विशेष दखल घेऊन ' आयबीएन-लोकमत 'ने त्यांना केलेला हा सलाम.जफर सुलतान मूळचे लखनौचे पण जन्मजात पक्के मुंबईकर आहेत. ' मी आज जो काही आहे. माझं नाव, माझी प्रतिष्ठा, पैसा-प्रसिद्धी हे सगळं या मुंबईमुळं आणि महाराष्ट्रामुळेच आहे ', अस सुलतान आवर्जून सांगतात. 1983 मध्ये ' अर्जुन ' या हिंदी सिनेमापासून त्यांनी संकलनाला सुरुवात केली. यानंतर बरोबर दहा वर्षांनी त्यांनी ' लपंडाव ' या मराठी सिनेमाचं संकलन केलं. ' मला मराठी समजतं. त्यावेळी सहज म्हणून वेगळं करायचं म्हणून मराठी चित्रपट केला.नंतर एकापाठोपाठ एक कामं मिळू लागली ', असं सुलतान यांनी सांगितलं. सध्याच्या मराठी अमराठी वादावर प्रतिक्रिया देण्याएवढे हे वाद मोठे नाहीत, असं त्यांना वाटतंय.जफरजींनी या वादावर ठोस प्रतिक्रिया दिली नसली तरी आपल्या बायकोला राज ठाकरे आवडतात, हे सांगायला त्यांच्यातला एडिटर विसरला नाही. शेवटी कलाकाराला भाषेच्या आणि प्रांताच्या मर्यादा नसतात, हे त्यांनीही दाखवून दिलं.

close