हवामानाचा अंदाज देणार्‍या पहिल्या डॉपलर रडारची उभारणी

March 2, 2011 2:29 PM0 commentsViews: 10

02 मार्च

हवामान विभागाच्या अंदाजावर बरच काही अवलंबून असतं पण बरेचदा हवामान खात्याचा अंदाज चुकतो. पण यापुढे अचूक अंदाज देणारे राज्यातील पहिलं डॉपलर रडार नागपूरमध्ये बसवण्यात आलं आहे. पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान असलेलं हे रडार परिसरातील पाचशे किलो मीटरपर्यंतच्या हवामानाचा अंदाज सांगू शकेलं.

नागपूर विमानतळ परिसरात भल्या मोठ्या इमारतीवर फुटबॉलसारखं दिसणारं डॉपलर रडार. हवामानाचा अंदाज अचूकपणे सांगणारे जगभरातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. फयान आणि सुनामीसारख्या घटनानंतर देशभरात हवामानाचा अंदाज अचूक वर्तवण्यासाठी डॉपलर रडार बसवण्यास सुरूवात झाली. राज्यातील पहिलं डॉपलर रडार नागपूरमध्ये बसवण्यात आले. डॉपलर रडारच्या माध्यमातून हवेचा वेग-दिशा-ढगांची क्षमाता पाऊस किती आणि कसा पडेल तसंच मान्सूनबद्दलची माहिती डिजीटल सिग्नलमुळे रियल टाईम मिळू शकेल. देशात दरवर्षी अतिवृष्टी किंवा पुराच्या तडाख्यानं कोट्यवधीच नुकसान होतं.

देशात कोलकाता, विशाखापट्टनम, मछलीपटन्नम आणि चेन्नई या समुद्र किनार्‍याच्या भागात डॉपलर रडार बसवण्यात आले आहेत. दुसर्‍या टप्यात हैद्राबाद, दिल्ली आणि नागपूर डॉपलर रडारने जोडण्यात आले आहे. राज्यातील हे पहिलं रडार असलं तरी येत्या काही महिन्यात मुंबईसह चार जिल्ह्यात डॉपलर रडार बसवलं जाणार आहे. डॉपलर रडारद्वारे मिळणारी माहिती आठ तास आधी मिळते. त्यामुळे बर्‍याच अंशी शेतकर्‍यांसमोर असलेल्या हवामानाच्या संकटाला थोड फार तरी कमी करता येईल जेणेकरून शेतकरी आपल्या शेतातील कामांचं वेळेत नियोजन करू शकेल.

close