कलमाडींची निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात तफावत !

March 2, 2011 4:52 PM0 commentsViews: 5

02 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडींपुढच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने त्यांच्या पुण्यातल्या बँकांमधल्या लॉकर्सची तपासणी केली. तसेच आयसीआयसीआय या बँकेतलं लॉकर सील केलं. या लॉकरमधले दागिने आणि कलमाडी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातली माहिती यात तफावत असल्याचं समोर आलं आहे.

सीबीआयनं मंगळवारी पुण्यात सुरेश कलमाडी यांचं बँक लॉकर सील केलं. सूत्रांच्या माहितीनुसार या लॉकरमध्ये कोट्यवधी रूपयांचं सोनं सीबीआयच्या हाती लागले आहे. विशेष म्हणजे कलमाडी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ 65 लाखांचे सोनं आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कलमाडींनी आयोगाला खोटी माहिती सादर केली का ? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. पण आपण कुठलाही इन्कम टॅक्स चुकवला नसल्याचा दावा कलमाडींच्या पत्नींनी केला.

कलमाडींनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती अशी आहे. कलमाडी यांच्या नावे 12 लाख 52 हजार 603 रूपयांचे दागिने आहेत. तर पत्नी मीरा कलमाडी यांच्या नावावर 53 लाख 40 हजार 170 रूपयांचे दागिने आहेत. म्हणजेच कलमाडी दाम्पत्यांकडे असलेल्या एकत्रित सोन्याच्या दागिन्यांची किंमत 65 लाख 92 हजार 773 रूपये असं कलमाडींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलं होतं. मग कलमाडींच्या लॉकरमध्ये इतकं सोनं आलं कुठून असा सवाल आता विचारला जातोय.

निवडणूक आयोगला प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास संबंधितांची खासदारकी रद्द करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. यापूर्वी आयोगानं या अधिकाराचा वापर केला आहे. आता चारही बाजूंनी गोत्यात आलेल्या कलमाडींना निवडणूक आयोगाचाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कलमाडींची 'सुवर्णसंपत्ती'

- सुरेश कलमाडींच्या नावे 12 लाख 52 हजार 603 रूपयांचे दागिने- मीरा कलमाडींच्या नावे 53 लाख 40 हजार 170 रूपयांचे दागिने- कलमाडी दाम्पत्याच्या नावावर 65 लाख 92 हजार 773 रूपयांचे दागिने आहेत