काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांचं निधन

March 4, 2011 5:00 PM0 commentsViews: 1

04 मार्च

ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांचं दिल्लीत निधन झालं आहे. मृत्युसमयी ते 81 वर्षाचे होते. काही दिवसापुर्वी छातीत दुखत असल्यामुळे सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होत. त्यातचं त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच निधन झालं. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं केंद्रामध्ये त्यांनी अनेक खाती सांभाळली.

आयुष्यभर अर्जुन सिंग गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. पंजाबचे राज्यपाल असतांना राजीव गांधी आणि लोंगोवाला यांच्यात करार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. भोपाळ विषारी वायू दुर्घटनेच्या वेळी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. अल्पसंख्याकाची कायम पाठराखण करणारे काँग्रेस नेते म्हणून ते ओळखले जातं असतं. अलीकडे सिंग यांना काँग्रेस पक्षातून डावलण्यात येत होतं. त्यांना मंत्रिमडंळात घेण्यात आलं नाही. काँग्रेस कार्यसमितीतूनही त्यांना वगळण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलीला तिकीटही नाकारण्यात आलं. त्यामुळे ते व्यथित होते.

close