द्रमुकने युपीएचा पाठिंबा काढला

March 5, 2011 2:38 PM0 commentsViews: 1

05 मार्च

द्रमुकने युपीए सरकारचा पाठिंबा काढला आहे. द्रमुकचे सर्व केंद्रीय मंत्री आता राजीनामा देणार आहेत. यापुढे द्रमुक युपीए सरकारला केवळ मुद्यावर आधारित म्हणजेच बाहेरुन पाठिंबा देणार आहे. 13 मार्चला तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. याबद्दलच द्रमूक आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन तणाव होता. या आठवड्यात दोन्ही पक्षात तीन महत्वपूर्ण बैठका झाल्या. पण ही बोलणी फिस्कटली. काँग्रेसने 60 जागांची मागणी केली आहे. मात्र चर्चेच्या फेर्‍यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेसला 55 जागा देण्यावर शिक्कामोर्तब झालं अशी माहिती मिळतेय. असं असूनही काँग्रेस आता 60 जागा मागत असल्याचा द्रमुकचा दावा आहे.

मागच्या वेळी काँग्रेसने 48 जागा लढवल्या होत्या. यावेळच्या काँग्रेसच्या मागणीवरुन काँग्रेसला युती करायची नाही.अस द्रमुकचं म्हणणं आहे. द्रमुक सत्तेत आल्यास काँग्रेसनेही सरकारमध्ये सहभागी होण्याची मागणी केली आहे. द्रमुकचे तिनही केंद्रीय मंत्री आता राजीनामा देतील. आधीच ए राजा यांच्यावरुन हा तणाव वाढलेला होता. आयबीएन नेटवर्कला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. काँग्रेस जयललीतांसोबत युतीस तयार नाही अशी माहिती आहे. एकूण 234 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

close