काँग्रेसचा फरार नगरसेवक एजाज बेग गजाआड

March 6, 2011 10:04 AM0 commentsViews: 1

06 मार्च

तेल भेसळीचा गुन्हा दाखल झालेले मालेगावचे काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग यांची नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली. रॉकेल भेसळ केल्याच्या गुन्ह्याखाली 12 फेब्रुवारीला त्यांच्यावर आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून ते पोलिसांच्या हातावर तुरी देवून फरार होते. दरम्यान 27 फेब्रुवारीला विधान परिषद निवडणुकीसाठी हा फरार नगरसेवक मतदान करून गेल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. शेवटी नगरसेवक बेग स्वत:हून न्यायालयात हजर झाले. रात्रभर मालेगावच्या सबजेलमध्ये मुक्काम केल्यावर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील आतापर्यंत बेग अनेकदा अटक झाली असेल तरी जेलमध्ये जाण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत त्यांना 8 वेळा अटक करण्यात आली पण मेडिकलचं कारण देवून त्यांचा पाहुणचार पोलीस कोठडी ऐवजी हॉस्पिटलमध्येच होत होता. पहिल्यांदाच त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली.

आतापर्यंत त्यांच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 7 गुन्हे रॉकेल भेसळीचे आहेत तर 1 गुन्हा प्राणघातक हल्ल्याचा आहे.काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग यांचा रॉकेल भेसळीचा धंदा जुनाच आहे. रॉकेलचे त्यांचे 7 टॅकर आहेत. याद्वारे सर्रासपणे भेसळ चालते. आतापर्यंत बेग यांच्यावर रॉकेलभेसळीचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय त्यांचे वडिल अजीज बेग आणि भाऊ राजू बेग यांच्या विरुद्धही रॉकेल भेसळीचे गुन्हे आहेत.

मालेगावमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनमधील त्यांचे गुन्हे एकत्र करून त्यांच्यावर कोणती कारवाई करता येऊ शकते याचा शोध मालेगाव पोलीस करत आहेत.

close