एका आदर्श सहजीवनाची कहाणी…

March 8, 2011 3:08 PM0 commentsViews: 3

शची मराठे, मुंबई

08 मार्च

कामानिमित्तानं स्त्रिया घराबाहेर तर पडल्या मात्र घरच्या जबाबदार्‍या मात्र अजूनही स्त्रियांनाच पार पाडाव्या लागतात. घरच्या कामांमध्ये जर जोडीदाराची साथ मिळाली तर खर्‍या अर्थांने जीवन हे सहजीवन ठरेल. अशाच एका आदर्श सहजीवनाची ही कहाणी..आरती आणि महेंद्र दोघेही पेशानं शिक्षक. आदर्श शिक्षक असलेला महेंद्र घरातदेखील आदर्श नवरा आहे.

दोघांनी कामं वाटून घेतली. ती जर जेवण बनवत असेल तर त्याच वेळी तो बाहेरची काम आवरुन घेतो. ती एकवेळची भांडी घासते तर तो रात्रीची घासतो. त्यांने मुलीला आंघोळ घातली तर ती कपडे करते.

स्त्रियांची आणि पुरुषांची कामं वेगळी अशी नाही तर ती सोयिस्करपणे झाली. ती बदलत असतात, वेळ आणि गरजेप्रमाणे. आरती नाईक सांगते की, मला समानता मानणारा नवरा हवा होता. मी आई- वडिलांना सांगायचे मला असा नवरा निवडा आर्थिक स्थिती चांगली नसली तरी चालेल. लोकांना वाटायचे माझे लग्न कसं जुळेल. ही मुलगी कशी खपायची. मी ठरवले होते की वाट पाहायची पण मला पुढील संघर्ष नको होता.

काम करण्याची सवय महेंद्र आणि आरती या दोघांनाही लहानपणापासूनची. त्यांचा नेमका हाच गूण जुळला आणि त्यांनी लग्न केलं. महेंद्रची अटचं होती रजिस्टर लग्न करणार पत्रिका पाहणार नाही. पुरुषांना लग्न झालेले दाखवावे लागत नाही ना मग स्त्रियांना का असावं हा विचार महेंद्रने केला.

त्यामुळेच आता आरती आणि महेंद्रचा संसार हा चारचौघांपेक्षा वेगळा ठरला आहे. महेंद्रची भक्कम साथ असल्याने आरतीचा सगळा वेळ स्वयंपाक घरात राबण्यात जात नाही. आरती म्हणते मला माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळतो मला फिरायला आवडतं. पुस्तकं वाचायला आवडतात. ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या मी करते. आणि महेंद्र मला मदत करत नाही, तर त्याला ते स्वत:च कर्तव्य वाटतं.

आपल्या मुलगी जेसिकानं मोठं झाल्यावर कोण व्हावे याचा विचार आरती – महेंद्र आत्ता करीत नाहीत. मात्र त्यांचे समानतेचे विचार तिनं पुढे न्यावेत एवढी अपेक्षा मात्र नक्की आहे. नावामधील विषमता कमी करायची. जेसिका ही जेसिका आरती महेंद्र म्हणून ओळखली जाईल. इतका प्रयत्न तरी आम्ही नक्की करणार आहोत.

close