मनसेला पाच वर्ष पूर्ण..

March 9, 2011 11:15 AM0 commentsViews: 11

विनोद तळेकर, मुंबई

09 मार्च

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन ते तीन वर्षात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला पक्ष म्हणजे मनसे. महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र असल्याचं सांगत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वादग्रस्त विधानं आणि मुद्द्यांना हात घातला. आज हा पक्ष पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षांत पदार्पण करतोय.

शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी 2006 मध्ये आपल्या समर्थकांसह मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली. एक हिंदुत्व हा मुद्दा वगळता मनसेची ध्येयधोरणं, मुद्दे आणि संघटनात्मक रचना या सगळ्या बाबी अगदी शिवसेनेशीच साधर्म्य साधणार्‍या. सुरूवातीच्या दीड दोन वर्षात या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात काही विशेष कामगिरी केली नाही. पण 2008 साली राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा हाती घेतला आणि पक्षाच्या यशाचा आलेख भरभर उंचावत गेला.

विधानसभेच्या आपल्या पहिल्याचं प्रयत्नात तर राज ठाकरे यांनी 13 आमदार निवडून आणत राजकीय धक्का दिला. त्या पाठोपाठ झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतही खोर्‍यानी मतं जमवत आपला पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्येही प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं.

गेल्या दोन तीन वर्षात राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या यशाचा आलेख भरभर उंचावत नेला. पण याच प्रवासात आधी राजा चौगुले, जितेंद्र जनावळे, आणि मग श्वेता परूळकर यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करत पक्षाबाहेर पडले. त्याचा पक्षावर फारसा फरक जरी पडला नसला तरी राज ठाकरेंनी महाराष्ट्राला दाखवलेलं महाराष्ट्र नवनिर्माणाचं स्वप्न अजून कागदावरच आहे. आणि त्यांनीच वारंवार उल्लेख केलेली विकासाची ब्ल्यु प्रींट ते कधी दाखवतायत याकडे सामान्य जनतेसोबतच त्यांच्या विरोधकांचंही लक्ष लागले आहे.

गेल्या पाच वर्षात राज ठाकरे म्हणजेच मनसे हे समीकरण झालंय. त्यामुळे येत्या काळात पक्षाची दुसरी फळी मजबूत करण्याचे आव्हानही राज यांच्यासमोर असेल. तसेच राज यांनी प्रचारात म्हटल्याप्रमाणे त्यांचे आमदारही विधानसभेत काही विशेष कामगिरी करताना दिसत नाहीत. त्यातचं येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या मुंबई, पुणे आणि ठाणे या महानगरपालिकांच्या निवडणुकाही पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या सगळ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे वर्धापन दिनाच्या मेळाव्यात काय बोलतात हे पाहावं लागेल.

अनेक आंदोलनात किंवा वादग्रस्त मुद्द्यांमध्ये गेल्या तीन वर्षात राज यांनी अचूक 'टायमिंग' साधत आपल्या विरोधकांना निरूत्तर केलं. त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला वेगवेगळ्या निवडणुकात झाला.

close