मंदीमुळे ऑटो सेक्टरला फटका

November 7, 2008 10:34 AM0 commentsViews: 3

7 नोव्हेंबर, मुंबई मंदीमुळे कमी झालेली गाड्यांची विक्री आणि वाढता उत्पादन खर्च यामुळेऑटो सेक्टरला घरघर लागली आहे. टाटा मोटर्सचा जमशेदपूर प्लांट 9 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे तसंच टाटांनी त्यांचा पुण्यातला प्लांटही 22 ते 27 नोव्हेंबर या काळात बंद ठेवण्याचं ठरवलंय. याकाळात कॉन्ट्रॅक्टवरच्या कामगारांना अर्धपगारी रजा मिळण्याची शक्यता आहे तर इतर कर्मचार्‍यांना पूर्ण पगारी रजा मिळेल. या सगळ्याचा नॅनोच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही. अशोक लेलँडनंही त्यांचे कर्नाटकातले होसूर आणि एन्नोर प्लांट, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातले एकूण 12 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉस्ट कटिंगमुळे टाटा मोटर्ससारखी बडी कंपनीदेखील अडचणीत आली आहे. कंपनीनं छटपूजेच्या निमित्तानं त्यांच्या जमशेदपूरमधील कर्मचार्‍यांना तीन दिवसांची रजा घ्यायला लावली आणि या रजा बिनापगारी आहेत. बुधवारपासून छटपूजेच्या सणासाठी कंपनीनं जमशेदपूर प्लांट बंद ठेवलाय. त्यामुळे सुमारे 7 हजारांहून अधिक कामगारांना सक्तीची रजा घ्यावी लागली. या कारखान्यातले सुमारे 95 टक्के कामगार सध्या सक्तीच्या रजेवर आहेत तर आणखी 4 हजारांवरही ही वेळ येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे.

close