जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा ;300 ठार

March 11, 2011 9:32 AM0 commentsViews: 10

11 मार्च

जपानच्या ईशान्य भागातल्या अनेक शहरांना भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 8.9 होती. या भूकंपानंतर जपानला त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. अनेक शहरांमध्ये त्सुनामीचं पाणी घुसलेलं आहे. यात सेंदाई बंदर पाण्याखाली गेलंय. या त्सुनामीमुळे आतापर्यंत साडेतीनशे लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानची राजधानी टोकियापासून 400 किलोमीटर्सच्या अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. या घटनेनंतर जपानमधल्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. जवळपास 40 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून 5 अणुप्रकल्प बंद करण्यात आले आहेत. जपानमधल्या या हाहाकारानंतर तिथं इमर्जन्सी टास्क फोर्स तैनात करण्यात आली आहेत. जपानमधल्या या दुर्घटनेनंतर जपानच्या शेजारील देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ग्वाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया,ऑस्ट्रेलिया आणि रशियालाही सुनामीची इशारा देण्यात आला. मात्र भारतासाठी या त्सुनामीचा धोका नाही असे स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

अणुऊर्जा प्रकल्पांना फटका ; आणीबाणी जाहीर

जपानमध्ये झालेल्या प्रलंयकारी भूकंपानंतर त्याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पांना अणुऊर्जा प्रकल्पांमधली कूलिंग सिस्टिम बंद पडल्याने तिथं आग लागल्याचं प्राथमिकदृष्ट्या बोललं जातंय. पण एकूणच या सगळ्या आपत्तीमुळे जपान सरकारने तिथं आणीबाणी जाहीर केली.

अणुऊर्जा प्रकल्पाला आग जरी लागली असली तरी त्या प्रकल्पामधून कुठल्याही प्रकारचं रेडिएशन झालेलं नसल्याचा निर्वाळा जपान सरकारने दिला. फुकुशिमा इथं असलेल्या अणुउर्जा प्रकल्पामध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने तिथं सिस्टिम फेल झाली त्यामुळे तिथं आग लागल्याचे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

प्रकल्पाला आग जरी लागलेली असली तरी प्रकल्पाचा मुख्य भाग सुरक्षित असून, त्याला कुठलाही धोका नसल्याचा दावा कंपनीने केला. अणुऊर्जा प्रकल्पाला जरी आग लागलेली असली तरी तिथून कुठल्याही प्रकारचे रेडिएन होत नसल्याचा दावा संबंधित कंपनीनं केला. फुकुशिमा बरोबरच मियागी शहरातही अणुऊर्जा प्रकल्प आहे. आग लागल्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालंय. पण अजून त्याच्या आर्थिक नुकसानीचा कुठलाही अंदाज अजून वर्तवला जात नाही.

जपानला आर्थिक धक्का

आधीच नाजूक अवस्था असलेल्या जपानच्या अर्थव्यवस्थेला सुनामीमुळे मोठाच धक्का बसला. जपानची निर्यात घसरतेय आणि कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. 1995 साली झालेल्या कोबे भूकंपात जपानचे तब्बल 10 लाख कोटी येनचं नुकसान झालं होतं आणि आता झालेल्या सुनामीनं नुकसानीचा आकडा त्यापेक्षाही जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या जपानचं जेवढं आर्थिक उत्पन्न आहे त्याच्या दोनशे पटीनं कर्जाच्या बोजाही आहे. 2008 च्या जागतिक मंदीनंतर जपान पूर्णपणे सावरलाच नाही आणि त्यात आता हे सुनामीचं संकट. एकंदरित सुनामीचा हा सर्वात मोठा तडाखा जगातल्या तिसर्‍या सर्वात मोठ्या इकॉनॉमीलाही बसला आहे.

पन्नास देशांना त्सुनामीचा इशारा पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात साधारण पन्नास असे देश आहेत की त्यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जी बेटं समुद्र पातळीच्या उंचीबरोबर आहेत त्यांना त्याचा धोका अधिक संभवतो. कदाचित या त्सुनामीच्या लाटा ह्या 20 फूट उंचीच्याही असू शकतात. त्यामुळे त्याच्या मार्‍यापुढे संपूर्ण बेटदेखील पाण्याखाली जाऊ शकतं. भारतीय प्रमाणवेळेनुसार इंडोनेशियामध्ये रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुनामीच्या लाटा धडकू शकतात.

प्रत्येक देशाच्या ठिकाणची किनारपट्टी निराळी असल्याने तिथं सुनामीच्या लाटांमुळे पाण्याची पातळी किती असू शकते याचा अंदाज लावता येणार नाही. भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या आसपास जे देश येतात त्यात त्सुनामीचा सर्वात पहिला फटका बसेल तो तैवानला. त्यादृष्टीनं तैवाननं सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहेत. 50 फूट उंचीवर थांबणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे.

त्सुनामीच्या लाटांमुळे शहरात शिरलेलं पाणी दक्षिणपूर्व भागात पसरलं आहे. तुम्ही जर एखाद्या रस्त्यावरून जात असाल तर पाणी तुम्हाला कधी येऊन घेरेल हे सांगता येत नाही, त्यामुळे त्यातून तुम्हाला सहजासहजी बाहेर पडणं अशक्य आहे. तुम्ही विचार करेपर्यंत काहीक्षणातच तुमच्या आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे जलमय होऊन जाणार आहे. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी पोहचणं हेच सगळ्यांच्या दृष्टीनं हिताचं ठरणार आहे.

भूकंपानंतर जपानमध्ये आलेल्या त्सुनामीनं जनजीवन विस्कळीत झालंय. आम्ही जपानमध्ये असलेल्या लोकांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथं सर्व फोन सेवा ठप्प झाल्या आहेत. फेसबुकवर हे लोक संपर्कात आहेत. जपानमध्ये असलेल्या संकेत देशपांडे यांनी फेसबुकवर तिथल्या परिस्थितीविषयी माहिती दिली.

सुनामीमध्ये सोशल नेटवर्कचा आधार

"हा आजपर्यंतचा आम्ही अनुभवत असलेला सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपानंतर तीन तास आम्ही अतिशय धक्क्यात होतो. मी सध्या टोकियोजवळ असलेल्या माझ्या ऑफिसमध्ये आहे. माझ्या माहितीनुसार टोकियो आणि योकोहामा शहरातील नागरिक सुरक्षित आहेत. आम्ही सर्व फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आहोत.

मोबाईल फोन सेवा ठप्प असून लँडलाइन आणि पब्लिक बुथ सुरू आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या नातेवाईकांना संपर्क साधायचा असेल त्यांनी लँडलाइन नंबरवर संपर्क साधावा. रेल्वेसेवा बंद असून बस आणि टॅक्सीसाठी प्रचंड रांगा लागल्या आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचारी सर्व रेल्वे ट्रॅकची पाहणी करत असल्यामुळे सेवा सुरू होण्यास वेळ लागतोय.'' – संकेत देशपांडे थेट जपानहून

जपानला त्सुनामीचा तडाखा

- टोकियोच्या किनार्‍यावरील समुद्राजवळील इचिहारा शहर, जिथे सर्वात जास्त इन्डस्ट्री आहे तेथील इंडस्ट्रीमध्ये त्सुनामीमुळे आग- जपानमध्ये पंतप्रधानांनी इमर्जन्सी टास्क फोर्स तैनात करण्यात आला- उत्तरीय जपान भाग आणि टोकियोमध्ये रेल्वे सेवा खंडित – जपानमध्ये सगळी वाहतूक सेवा बंद- जपाननंतर आता तैवानला धोका- 1995 नंतरचा जपानमधला सर्वात मोठा भूकंप

close