सौरव गांगुली अनोख्या रेकॉर्डला मुकला

November 7, 2008 9:23 AM0 commentsViews: 4

07 नोव्हेंबर नागपूर,शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी करत करिअरचा शेवट दिमाखदार करण्याचा सौरव गांगुलीचा प्रयत्न केवळ पंधरा रन्सनी हुकला. आपल्या पहिल्या तसंच शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी करण्याच्या अनोख्या रेकॉर्डलाही तो थोडक्यात मुकला. पण त्याची 85 रन्सची खेळी या टेस्टमध्ये भारतीय टीमसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. एकूणच गांगुलीचं आतापर्यंतचं योगदान भारतीय क्रिकेटसाठी मोलाचं ठरलंय. भारताच्या फॅब्युलस फोर बॅटिंग चौकडीतला एकमेव डावखुरा बॅट्समन म्हणजे सौरव गांगुली. पण इतर तिघांच्या मानाने नेहमीच वादग्रस्त आणि त्याच्या इतके कमबॅक इतर तिघांना कधीच करावे लागले नाहीत. पण हे ही खरं की महाराजा गांगुलीने आपला प्रत्येक कमबॅक झोकात केला. त्याच्या स्टाईलने.आताही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सिरीजपूर्वी इराणी ट्रॉफीसाठी त्याला वगळण्यात आलं होतं. पण बोर्डर – गावस्कर सिरीजमध्ये निवड समितीने त्याला संधी दिली. यापूर्वीच्या प्रत्येक मिळालेल्या संधीप्रमाणे याही संधीचं त्याने सोनं केलं. स्वत:ला सिद्ध करण्याचा त्याने मन:पूर्वक प्रयत्न केला. आणि त्यात तो यशस्वी झाला. सिरीजपूर्वीच निवृत्ती जाहीर करण्याचा त्याचा निर्णयही त्याला साजेसाच होता. त्याच्या सारख्या लढाऊ बाण्याच्या खेळाडूसाठी त्याची आजची इनिंग म्हणजे परफेक्ट फिनिश म्हटलं पाहिजे.

close