वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. तायडे अँटी करप्शनच्या जाळ्यात

March 15, 2011 11:30 AM0 commentsViews: 4

अद्वैत मेहता,पुणे

15 मार्च

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे हे अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडले आहेत. सरकारी मेडिकल कॉलेज्‌ना पुरवण्यात येणार्‍या यंत्र – सामुग्रीत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तायडेंवर ठेवण्यात आला आहे. तसेच तायडेंनी स्वत:च्या वयाबद्दलही खोटी माहिती दिल्याचंही आता उघडकीस आलंय.

पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये 10 व्हेंटिलेटर्स देण्यासाठी 3 कोटी 2 लाख रुपये मोजण्यात आले पण बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत फक्त 80 लाख रुपये आहे. मुंबईतल्या कामा हॉस्पिटलमधे कॅन्सर पेशंटना रेडिएशन थेरपी करण्यासाठी आवश्यक असलेल्या लिनिअर ऍक्सिलेटर या उपकरणाची खरेदी 33 कोटी रुपयांना करण्यात आली पण बाजारभावाप्रमाण त्याची किंमत आहे 13 कोटी रुपये. या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय माहितीच्या अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते शहीद रजा बर्नी यांनी. या प्रकरणी मुंबई ऍंटी करप्शन विभागाने तायडेंविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

विशेष म्हणजे तायडे यांनी एमबीबीएस प्रवेशाच्या वेळी जन्मतारखेची चुकीची नोंदणी केल्याचंही पुराव्यानिशी उघड झालंय. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अद्यक्ष डॉ. एस. व्ही. घोरपडे यांनी. तायडे यांनी वय चोरल्याचं पुराव्यानिशी दाखवून दिलंय. त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपला असूनही ते कार्यरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तायडे यांनी पत्र लिहून केली. पण तायडेंना काही अधिकारी आणि मंत्री पाठीशी घालतायत असा बर्नी यांचा आरोप आहे. तायडे यांच्यावर या अधिवेशनापूर्वी लवकर कारवाई करावी नाहीतर जनहित याचिका दाखल करू असा इशारा बर्नी यांनी दिला.

close