विलासरावांवर कारवाई करावी राष्ट्रपतींकडे शेतकर्‍यांची मागणी

March 15, 2011 3:06 PM0 commentsViews: 5

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

15 मार्च

विदर्भातल्या सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी आज अखेरचा मार्ग म्हणून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. सावकार आमदार दिलीप सानंदा आणि विलासरावांवर कारवाई करा आणि सावकारी अधिनियम 2010 वर स्वाक्षरी करा अशा दोन मागण्या दिल्लीत गेलेल्या 86 शेतकर्‍यांनी राष्ट्रपती प्रतिभाताईं पाटील यांच्याकडे केल्या.

तहसीलदारापासून ते पंतप्रधानांपर्यंत कुणीच ऐकत नाही म्हणून विदर्भातल्या सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी थेट राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावला. खामगावचे सावकार आमदार दिलीप सानंदा यांना पाठीशी घालणार्‍या विलासरावांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. पण त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणून हताश झालेले याचिकाकर्ते शेतकरी सारंगसिंग चव्हण राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेटले. आणि विलासरावांना पदावरून काढण्याची मागणी केली.

भाजपचे खासदार संजय धोत्रे आणि हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या 86 शेतकर्‍यांनी आपल्या भागात सुरू असलेल्या सावकारी जाचाची माहिती राष्ट्रपतींना दिली. महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेने संमत केलेलं सावकारी अधिनियम 2010 सध्या राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहे. ही सही झाल्यावर सावकारांना चाप बसू शकणार आहे. यावर लवकर सही करा अशी विनंतीही यावेळी या शेतकर्‍यांनी प्रतिभाताईंना केली.

close