राष्ट्रवादीने राखीव निधी परस्पर वळवल्याचा विरोधकांचा आरोप

March 16, 2011 4:04 PM0 commentsViews: 6

16 मार्च

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी बळाचा वापर करत विरोधक नगरसेवकांच्या वार्डातल्या विकासकामांसाठी राखीव असलेला निधी परस्पर वळवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधार्‍यांच्या या कृत्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातली सगळ्यात श्रीमंत महापालिका समजली जाते. महापालिका निवडणुकीचे पडघम इथेही वाजायला सुरूवात झाली आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे विरोधकांचा वॉर्डस्तरीय निधीच परस्पर वर्ग करण्याचा घाट सत्ताधार्‍यांनी घातला आहे. यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोप विरोधक करत आहे.

महापालिकेच्या 2011-2012 साठीच्या अर्थसंकल्पात एकूण 275 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डातील विकासकामांसाठी अडीच कोटी निधी देण्यात आला होता. मात्र यापैकी 57 कोटीपेक्षा जास्त निधी पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकाराबद्दल महापौरांना विचारलं असता त्यात काही वावगं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अर्थसंकल्प जाहीर झाल्या नंतर एक उपसूचना मांडून हा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय 16 सदस्य असेलल्या स्थायी समितीमध्ये हा ठराव मांडला जात असतांना काँग्रेसचे नगरसेवक मात्र खाण्यात मशगुल होते असा त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांचा दावा आहे.आधीच जवाहरलाल नागरी पुनरुथ्थान योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, सायन्स पार्क , वादग्रस्त बी.आर.टी प्रकल्प अशा अनेक कारणावरून आधीच विरोधक आक्रमक झालेत. त्यातच आता निधीचा मुद्दा त्यांच्या हाती लागला आहे. याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटतीलच..पण त्यानं वॉर्डातल्या नागरिकांच्या समस्या सुटतील का हा प्रश्न आहे.

close