फुकुशिमा प्रकल्पात आणखी एक स्फोट

March 16, 2011 5:23 PM0 commentsViews: 12

16 मार्च

जपानमध्ये सुनामीनंतर संकट वाढलंय ते किरणोत्सर्गाचं. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पांमधील 4 नंबरच्या रिऍक्टरमध्ये आज पुन्हा स्फोट झाला. त्यामुळे रिअॅक्टरमधील बिल्डिंगमध्ये पुन्हा आग लागली. रिऍक्टरमधलं तापमानं वाढल्यानं फ्युएल रॉड्स वेगानं विरघळत आहेत. रॉड्स थंड करण्यासाठी जपानी लष्करानं हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा करण्याचा प्रयत्न केला. पण कमालीच्या उष्णतेमुळे तो प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला. फुकुशिमापासून 240 किलोमीटर अंतरावर असणार्‍या राजधानी टोकियोपर्यंत किरणोत्सर्ग पोचण्याची भीती निर्माण झाली आहे.

किरणोत्सर्गाच्या धोक्यापासून बचावासाठी जपाननं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच अमेरिकन लष्कराची मदत जपान मागण्याचीही शक्यता आहे. फुकुशिमामधली आण्विक दुर्घटना ही 1986 मध्ये युक्रेनमधल्या चेर्नोबिल अणु-दुर्घटेननंतरची दुसरी मोठी दुर्घटना असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चेर्नोबिलमधल्या अणुऊर्जा प्रकल्पात मानवी आणि तांत्रिक चुकामुळे दुर्घटना झाली होती. त्यातून बाहेर पडलेल्या किरणोत्सर्गाचा धोका युक्रेनसह रशिया, फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रिया आणि बल्जेरिया इत्यादी देशांपर्यंत पोचला होता. पण जपानमधील किरणोत्सर्गाचा भारताला कोणताच धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सुनामीतल्या मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा 12 हजारांच्या वर गेला आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. सुनामीचा फटका बसलेल्या भागात अन्न आणि पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यामागाटामध्ये नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू आणि इंधन खरेदी करण्यासाठी आज तासनतास रांगा लावल्या होत्या. सरकारसुद्धा लोकांपर्यंत मदत पोचवण्याचा प्रयत्न करतं आहे. दुसरीकडे किरणोत्सर्गाच्या धोक्यामुळे टोकियामधले सुपरमार्केट्स रिकामे करण्यात आले आहे.

close