काँग्रेसने विकत घेतले खासदार – विकिलिक्स

March 17, 2011 9:20 AM0 commentsViews: 3

17 मार्च

घोटाळ्यांच्या अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पाय आज आणखी खोलात गेला. 2008 मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावर डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे मनमोहन सिंग यांचं सरकार कोसळण्याच्या बेतात होतं. त्यावेळी काँग्रेसने खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट विकिलिक्स या बेवसाईटनं केला आहे.

या कॅश फॉर वोटची ची माहिती अमेरिकन दूतावासातल्या अधिकार्‍याने 17 जुलै 2008 रोजी अमेरिकन सरकारला पाठवली होती. विकिलिक्सच्या या केबल्स आज सकाळी द हिंदू या वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्या. आणि एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे नेते सतीश शर्मा यांचे सहकारी नचिकेता कपूर यांनी अमेरिकेन दुतावासाच्या अधिकार्‍याला खासदार खरेदीचे हे पैसे दाखवले होते असं विकिलिक्सनं म्हटलंय. या गौप्यस्फोटानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक सरकारवर तुटून पडले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच दोन्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडलं.

17 जुलै 2008 रोजी अमेरिकी दूतावासातील अधिकारी स्टीव्हन व्हाईट यांनी या प्रकरणाचा तपशील अमेरिकन सरकारकडे पाठवला होता. सतीश शर्मा यांचा उल्लेख राज्यसभेचे खासदार आणि राजीव गांधींचे जवळचे सहकारी असा करण्यात आला होता. हिंदूनं विकिलिक्सचा हा तपशील प्रसिद्ध केला.

- काँग्रेस नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचे सहकारी नचिकेता कपूरनी अमेरिकेच्या अधिकार्‍याला पैशांनी भरलेल्या बॅग्ज दाखवल्या- खासदारांना विकत घेण्यासाठी काँग्रेसने 50 ते 60 कोटी रुपये तयार ठेवल्याचे नचिकेतनी सांगितलं – अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या 4 खासदारांना प्रत्येकी 10 कोटी रु. दिल्याचे सांगितलं – पैशाचा प्रश्न नाही, पण पैसे घेतलेल्यांनी मतदान करायला हवं अशी चिंता व्यक्त केली – विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी पक्षातील अनेक नेते काम करत असल्याचं सांगितलं – संत चटवाल आणि इतरांच्या माध्यमातून अकाली दलाचे 8 खासदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला – पंतप्रधान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी अणुकरारासाठी प्रयत्न करत होते – भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य यांचीही मदत घेण्यावर विचार झाला – त्यावेळचे वाणिज्य मंत्री कमलनाथ यांनीही खासदार विकत घेण्यासाठी प्रयत्न केले- मताच्या बदल्यात लाच म्हणून छोटी विमानं देण्याचा त्यांचा प्रस्ताव होता – सरकारच्या बाजूनं 273, विरोधात 251 आणि गैरहजर 19 असं समीकरण काँग्रेसनं गृहीत धरलं होतं – या प्रकरणात काँग्रेसचे नेते अमेरिकेच्या अधिकार्‍यांशी मोकळेपणानं बोलले

अजित सिंह यांचा इन्कार

विश्वासदर्शक ठरावासाठी पैसे घेतल्याचा राष्ट्रीय लोकदलचे नेते अजित सिंह यांनी इन्कार केला आहे. मी आणि माझ्या खासदारांनी अणुकराराच्या विरोधात मतदान केल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

युपीए सरकारवर सर्वात मोठा डाग- स्वराज

दरम्यान युपीए सरकारवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाग आहे हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले आहे. असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. तर सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी सपाचे मुलायम सिंग यादव यांनी केली. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी माकपचे नेते सिताराम येचूरी यांनी केली.

close