आयपीएल लीगच्या धर्तीवर एमबीएल लीगचं आयोजन

March 17, 2011 12:31 PM0 commentsViews: 3

17 मार्च

आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेटप्रमाणे आता बॅडमिंटन खेळाचा प्रसार करण्यासाठी तसेच बॅडमिंडनमध्ये करिअर करू पाहणार्‍या महाराष्ट्रातील होतकरू खेळाडूंकरिता महाराष्ट्र बॅडमिंटन लीग स्पर्धा भरवण्यात येणार आहे.

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रात बॅडमिंटन लीगची संकल्पना राबवली जाणार आहे. हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे आणि ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनांच्या सहकार्यानं या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बॅडमिंटन लीगच्या पहिल्या सत्रामधे 6 टीम्सचा समावेश आहे. प्रत्येक टीममध्ये 7 खेळाडूंचा समावेश असून यात 5 पुरूष तर 2 महिला खेळाडू असतील. बॅडमिंटन खेळात वापरले जाणारे शटलकॉक पक्ष्यांच्या पिसापासून बनवले जात असल्याने प्रत्येक टीमला पक्षांची नावं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या संघाकरिता ब्रँडअम्बेसेडर म्हणून भार्गवी चिरमुले, सोनाली खरे, कादंबरी कदम, सई ताम्हणकर, रूजूता देशमुख, क्रांती रेडकर या अभिनेत्रींची निवड करण्यात आली आहे.

रविवारी 20 मार्चला खेळाडूंचे लिलाव होणार असून खेळाडूची बेसप्राईस ही त्यांच्या ग्रेडनुसार 30 हजार, 25 हजार आणि 15 हजार इतकी असेल. टीम मालकांना खेळाडू खरेदीकरिता 2 लाखाची मर्यादा घालण्यात आली आहे. पी. गोपीचंद प्रकाश पदुकोन, साईना नेहवाल सारख्या खेळाडूंमुळे बॅडमिंटन लोकप्रिय होत असताना आता या लीगमुळे ग्रामीण भागातही बॅडमिंटन पोहचेल आणि तिथल्या टॅलंटलाही वाव मिळेल अशी आशा आहे.

close