लिबियाचे अध्यक्ष गद्दाफी बॅकफूटवर

March 18, 2011 5:42 PM0 commentsViews: 1

18 मार्च

युरोपीय देशांनी दबाव आणल्यानंतर आज अखेर गद्दाफींनी युद्धविरामाची घोषणा केली. देशभर बंडाळी उसळल्यानंतर आणि अनेक शहरं निदर्शकांच्या हातात गेल्यानंतर गद्दाफींनी विरोध चिरडायला सुरवात केली होती. पण काल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने गद्दाफींविरुद्ध ठराव पास केला. आणि त्यानंतर फ्रांस व इतर काही देशांनी गद्दाफींवर हल्ल्याची तयारी सुरू केली. अनेक युरोपीय देश आपल्यावर हल्ला करू शकतात हे पाहिल्यावर आज गद्दाफींनी शस्त्रं ठेवली. अजूनही बेंगाझीसारखे महत्त्वाचे शहर निदर्शकांच्या हातात आहे. पण आता युद्धबंदी झाल्यामुळे हे शहर परत मिळण्याचे प्रयत्न गद्दाफी करू शकणार नाही.

लिबियामध्ये आता बंदुका शांत होणार असल्या तरी जवळच्याच येमेनमध्ये हिंसा वाढली आहे. राष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पायउतार व्हावे ही मागणी करणार्‍या निदर्शकांवर आज बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यात 31 निदर्शकांचा जीव गेला. शंभराहून जास्त लोक जखमी झाले.येमेनमध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने निदर्शनं दडपण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. शुक्रवारची प्रार्थना झाल्यानंतर युनिव्हर्सिटी स्केअरमध्ये जमलेल्या निदर्शकांवर छतांवरून गोळ्या झाडण्यात आल्या. निदर्शकांच्या मानेवर आणि डोक्यात गोळ्या मारण्यात आल्या आहेत असं डॉक्टरांनी सांगितले. इजिप्तमधल्या जॅस्मिन क्रांतीनंतर गेल्या महिन्याभरापासून येमेनमध्ये निदर्शनं सुरू आहेत.

close