जैन इरिगेशनला बोल्डनेस इन बिझनेसचा जागतिक पुरस्कार

March 19, 2011 11:06 AM0 commentsViews: 63

प्रशांत बाग. जळगाव

19 मार्च

जळगावच्या जैन इरिगेशनला बोल्डनेस इन बिझनेस हा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. शेतीसाठी संजीवनी ठरलेल्या ठिबक सिंचन या प्रणालीवर आधारीत व्यवसाय करण्यात जैन इरिगेशनचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हा पुरस्कार म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखतांना पाणी आणि उर्जा या दोघांचीही बचत करण्यात या कंपनीने केलेल्या कार्याचा गौरव मानला जातो.

मायक्रो इरिगेशन उत्पादनात जगात दुसर्‍या क्रमांकाची कंपनी असलेल्या या जैन इरिगेशनची उत्पादनं जगातील 169 देशांत विकली जातात. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन केलं तर शेतीच्या उत्पादनात वाढ होते. हाच विचार या कंपनीनं शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवला.

पाण्याची कमतरता, लोडशेडिंगचा फटका,खतांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ आणि पिकाना न मिळणारा हमीभाव यासारख्या कारणांनी शेतकरी आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलंय. पण शेती कसण्यासाठी शेतकर्‍यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना नियोजनाचं महत्व शिकवण्याचं कामही जैन इरिगेशन करतं. यामुळेच आता पाणी बचतीचं महत्व शेतकर्‍याना पटलं आहे.

शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात शेतकर्‍यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी एक निश्चित योजना आता जैन इरिगेशन या कंपनीनं तयार केली आहे. जगातील 250 उद्येागातून जैन इरिगेशनची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. सलग 30 वर्षांपासून शेती उद्योगासाठी उत्पादन करणार्‍या जैन इरिगेशन कंपनीनं स्वत: विकसीत केलेलं तंत्रज्ञान आज जगातील 110 देशात वापरले जात आहेत.

close