जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक

March 20, 2011 2:56 PM0 commentsViews: 5

20 मार्च

विविध मागण्या घेऊन अट्टाहास करणारे जावई आपल्याला पहावयास मिळतात. सासरच्या मंडळीकडून त्याचे हट्टही पुरविण्यात येतात. मात्र बीड जिल्ह्यातील विडा इथं जावायाला धुलीवंदनाच्या दिवशी चक्क गाढवावर बसवून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 75 वर्षांपासून सुरु आहे.

जावयाची गाढवावर धिंड काढण्याची परंपरा जहागिरदार आनंदराव देशमुखांनी सुरु केल्याचं येथे सांगितले जाते. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 150 घरजावई आहेत. धुलीवंदनाच्या आधी दोन दिवसापासून यांना शोधण्याची सुरुवात होते. यंदा गाढवावर बसायचा मान रामकिसन जाधव यांना मिळाला.

गाढवावर बसून जावयाची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते. तब्बल पाच तास ही मिरवणूक चालते, नंतर मारुतीच्या मंदिरासमोर येऊन जावयाला नवीन कपड्याचा आहेर देण्याची प्रथा आहे. एकदा गाढवावर बसविलेल्या जावयाला परत दुसर्‍यांदा गाढवावर बसविले जात नाही. विशेष म्हणजे गाढवावर बसणारा जावई सुध्दा उत्साहानं गाढवावर बसलेला असतो.

close